रेती उपलब्ध होत नसल्याने हिमायतनगर शहर व तालुक्यातील घरकुलाचे कामे ठप्प
रेती उपलब्ध करून देण्यासाठी घरकुलधारकांना वैक्तिक परवानगी अथवा रेतीघाटचे लिलाव करा
हिमायतनगर,अनिल मादसवार| शासन स्तरावर हिमायतनगर शहरात प्रधानमंत्री आवास व तालुक्यातील ग्रामीण भागात इंदिरा आवास घरकुलास मोठ्या मोठ्या प्रमाणात घरकुलास मंजुरी मिळाली आहे. परंतु घरकुल धारकांना बांधकामासाठी महत्वपूर्ण असलेल्या रेतीची उपलब्धता होत नसल्याने घरकुलची कामे थप्प्प झाली असून, सर्वसामान्य गोर गरीब नसगारिकांच्या घरकुलाचे स्वप्न स्वप्नच राहू नयेत यासाठी घरकुलधारकांना रेतीची उपलब्धता करून द्यावी. यासाठी तात्काळ रेती घाटाचे लिलाव करावे नाहीतर घरकुल धारकांना वयक्तिक रेतीची परवानगी द्यावी अशी मागणी घरकूलचे स्वप्न कधी पूर्ण या विवंचनेत असलेल्या लाभार्थ्यामधून केली जात आहे.
हिमायतनगर तहसील कार्यालय अंतर्गत येणाऱ्या पैनगंगा नदी काठावरील रेती घाटावरून महसूलच्या काही तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सर्रास रेतीचा विनापरवाना उपसा केला जात आहे. हा सर्व प्रकार महसुल विभागाच्या नदीकाठ भागातील सज्जाचे तलाठी, मंडळ अधिकारी यांच्या अर्थपूर्ण दुर्लक्षाने चालविला जात आहे. परिणामी शासनाचा लाखो रुपयाच्या महसुल बुडत आहे. नुकतेच एक रेतीचे वाहन पकडून दिखाव्यापुरती कार्यवाही करून हप्ता देणाऱ्या नदीकाठावरील काही ट्रॅक्टर मालकांना रेती तस्करीची मुभा देण्यात आली आहे. ते रेती तस्कर अव्वाच्या सव्वा दराने धंदडणग्यांना रात्रीच्या अंधारात रेती विकून शासन व जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत आहेत. यामुळे शासनाकडून उपलब्ध मंजूर झालेल्या गोर गरीब घरकुल धारकांना रेती मिळणे दुरापास्त झाले आहे.
पैनगंगा नदीघाटावरून रेतीचा गोरखधंदा सुरु
विदर्भ – मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीकाठावरील रेती पट्ट्याचे लिलाव होऊन कोण्यातरी व्यक्तीला ठेका दिला जात होता. परंतु यंदा अद्यापही रेती घाटाचे लिलाव झाले नसल्याने रेती दादांनी शासनाची गलेलट्ठ पगार घेणाऱ्या मंडळ अधिकारी, काही तलाठ्यांशी हातमिळवणी करत बिहारी मजुरांमार्फत रेतीचा बेसुमार उपसा सुरु केला आहे. आजघडीला शहरापासून ८ ते १० कि.मी. अंतरावर असलेल्या एकम्बां, कोठा ज., पळसपूर, रेणापूर, घारापुर, विरसनी, दिघी, सरसम नाला, कामारी, धानोरा, वारंगटाकळी, भागातील रेती घाटावरून रेतीचा सर्रास उपसा सुरु झाला आहे. या बाबतचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर हिमायतनगर तालुक्यात रेतीची चोरी आणि विक्री आता रात्रीला केली जात आहे.
जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी रेती तस्कराबाबत मोहीम उघडली खरी, परंतु याचा फायदा महसूल जमा होण्यात काही तस्करी करणाऱ्या रेती तस्करांना जास्त होत असल्याचे गोरगरीब घरकुलधारक रेती उपलब्ध होत नसल्याने घरकुलाच्या चिंतेत असल्यावरून दिसते आहे. हि बाब लक्षात घेता रेती तस्करीला आवर घालण्यासाठी तात्काळ हिमायतनगर तालुक्यातील रेती घाटाचे लिलाव करण्यात यावे नाहीतर घरकुल धारकांना वयक्तिक रेतीसाठी परवानगी द्यावी आणि शासनाच्या घरकुल योजनेला पूर्ण करण्यासाठी रेती उपलब्ध करून द्यावी अशी मागणी घरकुल लाभार्थ्यामधून केली जात आहे.