मुदखेड येथील पहिली अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद संपन्न
तथागत भगवान बुद्धाचा धम्म कर्मकांडाचा नाही तर माणसाने दैनंदिन जीवनात बुद्ध विचारांचे आचरण करण्याचा आहे, असे प्रतिपादन पूज्य भदंत प्रा. डॉ. खेमधम्मो महाथेरो यांनी केले. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड रेल्वे स्टेशन या तालुक्याच्या ठिकाणी संपन्न झालेल्या पहिल्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेत उद्घाटकीय धम्मदेसना देताना ते बोलत होते.
नालंदा चारीटेबल ट्रस्ट मुदखेड आणि सम्यक सामाजिक विकास संघ या संस्थेच्या वतीने बौद्ध धम्मभूमी प्रशिक्षण केंद्र येथील नियोजित बौद्ध विहाराच्या भव्य प्रांगणात एक दिवसीय अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद घेण्यात आली. पूर्णा येथील पूज्य भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो या धम्म परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते.
सकाळी ८ वाजता पंचशील धम्मध्वजारोहण धम्म परिषदेचे अध्यक्ष पूज्य भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी भिख्खू संघाने तथागत बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून बोधी वृक्ष जलदान आणि महाबोधी वंदना पवित्र बौद्ध वचनांनी घेतली.
मुदखेड शहरातून महाकारूणीक तथागत भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तसेच प्रतिमांची भव्य धम्म मिरवणूक काढण्यात आली. धम्म मिरवणुकीत भिख्खू संघाची उपस्थिती अतिशय नेत्रदीपक ठरली. बौद्ध उपासक- उपासिका पंचरंगी ध्वज हाती घेऊन शुभ्र वस्त्रांसह धम्म मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने शहरात धम्ममय वातावरण तयार झाले.
धम्म परिषदेत भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो, भदंत पैयारत्न थेरो, भिकू बुद्धभूषण, भदंत शीलरत्न थेरो, भदंत धम्मशील थेरो, भदंत संघपाल थेरो, भदंत पयानंद थेरो, भदंत सुभूती थेरो, भदंत अश्वजीत थेरो, भदंत पय्यावंश आदींची धम्मदेसना यावेळी उपस्थिती होती.
धम्म परिषद यशस्वी होण्यासाठी मुदखेड येथील समता सैनिक दल, व सर्व बौद्ध बांधव आणि नव युवकांनी परिश्रम घेतले होते.