अपघातानंतर उधळलेल्या बैलाचे शिंग डोक्यात घुसून महिला पोलिसाचा जागीच मृत्यू
भोकरदन: मुलीच्या साखरपुड्याची तयारी करण्यासाठी गावाकडे जात असलेल्या महिला पोलिस कर्मचारी आईचा आज सकाळी ११ वाजता राजूर जवळ अपघातानंतर बैल उधळून शिंग डोक्यात घुसल्याने मृत्यू झाला.
सुनीता डोभाळ (४५) असे मृत महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या बाबतची माहिती अशी की, सुनिता ईश्वरसिंग डोभाळ (रा इब्राहिमपूर तालुका भोकरदन) या जालना येथील पोलिस अधिक्षक कार्यालयात कार्यरत आहेत. त्या आज सकाळी मुलगा रोहीत सोबत दुचाकीवरून जालना येथून इब्राहिमपूरला जात होत्या. सकाळी 11 वाजेच्या सुमारास राजूरजवळ दुचाकीची आठवडी बाजारात विक्रीसाठी जात असलेल्या बैलांना धडक झाली. यावेळी एकमेकांना बांधलेले पाच ते सहा बैल उधळले. यात एका बैलाचे शिंग डोक्यात घुसल्याने सुनीता यांचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगा रोहितला किरकोळ मार लागल्याने बचावला. या प्रकरणात राजूर पोलिस चोकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची माहिती मिळताच इब्राहिमपुरेचे सरपंच रामसिंग डोभाळ, उदोजक महादूसिंग डोभाळ, रणजित भेडरवाल यांनी राजूरला जाऊन मुलाचे सांत्वन केले.
आई-वडिलांच्या निधनाने बहीणभाऊ पोरके सुनिता डोभाळ यांचे पती ईश्वरसिंग हे पोलिस खात्यात कर्मचारी होते. मात्र त्यांचे 10 वर्षांपूर्वी आजाराने निधन झाले. त्यानंतर त्यांच्या जागेवर पत्नी सुनिता यांना अनुकंपावर 2017 मध्ये नोकरी लागली. पतीच्या निधनानंतर त्यांनी मुलगी प्रियंका व मुलगा रोहित यांचा सांभाळ केला.अशातच प्रियंकाचा विवाह निश्चित होऊन 24 जानेवारी रोजी साखरपुड्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यासाठी गावाकडील नातेवाईक यांना निमंत्रण देणे व कार्यक्रमाची तयारी करण्यासाठी त्या मुलासोबत गावाकडे निघाल्या होत्या. मात्र काळाने त्यांच्यावर मध्येच झडप घातली. त्यांच्या अपघाती निधनामुळे मात्र बहिण भावाच्या डोक्यावरील वडीलानंतर आईचे देखील छत्र हिरावले.