“समरजितसिंह घाटगे जमिनीच्या तुकड्याचे वारसदार, हसन मुश्रीफांनी 600 मंदिरे बांधली, आम्ही तोंड उघडल्यास पळताभुई थोडी होईल”
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कोल्हापूर जिल्ह्यातील मातब्बर नेते आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आणि किरीट सोमय्या यांच्यात खणाखणी सुरु असतानाच कागल मतदारसंघांमध्येही भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे (Samarjeetsinh Ghatge) आणि हसन मुश्रीफ यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.
आता यामध्ये दोन्ही नेत्यांच्या समर्थकांनी सुद्धा एकमेकांना आव्हानाची भाषा सुरू केली आहे. समरजितसिंह घाटगे यांनी शनिवारी मुश्रीफ यांच्यावर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मला किरीट सोमय्यांच्या मागे लपायची गरज नाही, असे सांगत मुश्रीफांनी केलेले आरोप फेटाळत जोरदार प्रत्युत्तरही दिले. त्यामुळे मुश्रीफ यांच्या समर्थकांकडूनही समरजितसिंह यांना प्रत्युत्तर देण्यात आले.
जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने, तसेच सूर्यकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत घाटगे यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला. समरजित फक्त जमिनीच्या तुकड्याचे वारसदार असून मुश्रीफ यांनी यांनी 600 मंत्री बांधल्याचे ते म्हणाले. खऱ्या अर्थाने ते राज्यश्री शाहू महाराजांच्या विचारांचे वारसदार आहेत. घाटगे फक्त जमिनीच्या तुकड्याच्या वारसदार असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांनी केली. दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोपांची फैरी झडत असल्याने कागल तालुक्यामध्ये राजकारण चांगले ढवळून निघाले आहे. भैय्या माने यांनी घाटगे यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला.
ते म्हणाले की, मुश्रीफांवरील ईडी छापा टाकण्यामध्ये कोणाची षड्यंत्र हे सर्वांना माहीत आहे. केंद्रीय राज्यमंत्री भागवत यांची भेट घेतली होती. एका बाजूला ते बँकेसाठी विविध योजना देण्यासाठी भेटलो असले सांगत असले, तरी त्यांचा उद्देश वेगळाच होता. मंत्री कराड यांच्याकडे प्राप्तीकर आणि ईडी हे विषय येतात. त्यामुळे ईडीच्या छाप्या संदर्भात भेटले असे म्हणण्यास वाव आहे. 2024 मधील विधानसभा निवडणुकीत त्यांची अवस्था ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ सारखी होईल, आमदार मुश्रीफ यांच्यामागे कार्यकर्ते 40 वर्षांपासून आहेत. त्यांना कार्यकर्ते बोलावण्याची गरज लागत नाही.
दुसरीकडे सूर्यकांत पाटील यांनीही हल्लाबोल केला. ते म्हणाले की हसन मुश्रीफ यांच्या कारखान्यात लोकांनी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. सर्वसामान्य लोकांचे त्यांच्यावर प्रेम आहे. घाटगे यांनी मुंबई दिल्ली वाऱ्या करून शाहू दूध संघासाठी बोगस सबसिडी मिळवली. इतकेच नव्हे तर अनेक अशा गोष्टी आम्हाला माहीत आहेत, त्यामुळे आम्ही तोंड उघडले तर त्यांची पळताभुई थोडी होईल.
दरम्यान, ईडीच्या छापेमारीनंतर मुश्रीफ यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया देताना या कारवाईचे बोट समरजित घाटगे यांच्याकडे दाखवले होते. कागलमधील भाजप नेता गेल्या चार दिवसांपासून दिल्ली वाऱ्या करत होता. त्यामुळेच ईडी छापा पडल्याचे म्हणत त्यांनी थेट समरजित घाटगे यांच्यावर हल्लाबोल केला होता. या सर्व पार्श्वभूमीवर आता उद्या किरीट सोमय्या कोल्हापुरात येत आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून कोणती भूमिका घेतली जाणार? हे पण उत्सुक्याचे असणार आहे.
मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना कुठल्याही प्रकारचा विरोध करू नये, असे आवाहन केले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यामुळे उद्या सोमय्यांच्या दौऱ्याला विरोध होता का? हे पाहावं लागेल.