‘कामख्या देवीचा प्रकोप’; बच्चू कडूंच्या अपघातानंतर शिवसैनिकांच्या सोशल मीडियात पोस्ट
औरंगाबाद : प्रहार संघटनेचे प्रमुख तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू आज पहाटे एका अपघातात जखमी झाले.
त्यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांची प्रकृती चांगली असली तरी औरंगाबाद शहरात सोशल मिडीयावर शिवसैनिकांनी हा कामख्या देवीचा प्रकोप असल्याचे नमूद केले. त्यावर वेगवेगळी मते कॉमेंटमध्ये उमटू लागली.
आज पहाटे अमरावतीत रस्ता ओलांडत असताना एका दुचाकीस्वाराने बच्चू कडू यांना जोराची धडक दिली. या अपघातात कडू यांच्या डोक्याला इजा झाली. चार टाके देण्यात आले. पायालाही दुखापत झाली. प्राथमिक उपचार करून नंतर त्यांना तातडीने नागपुर येथे हलविण्यात आले. कडू यांनी स्वत: ट्विट करून प्रकृती ठणठणीत असल्याचे नमूद केले. दरम्यान, सोशल मिडीयावर या घटनेचे पडसाद उमटताना दिसून आले. शहरातील एका शिवसैनिकाने कडू व्हील चेअरवर बसून जातानाचा एक फोटो पोस्ट केला. त्यावर एका ओळीची कॅप्शन लिहली. त्यात ‘कामख्या देवीचा प्रकाप’ एवढाच शब्दप्रयोग करण्यात आला. त्यानंतर कॉमेंट करणाऱ्यांच्या उड्या पडल्या.
‘चांगल्या माणसाला त्रास दिल्याचा परिणाम’ असल्याचे एकाने अप्रत्यक्षपणे टोला मारला. मंत्रीमंडळ विस्तार लवकर करा, हा देवीचा प्रकोप दिसतोय असे दुसऱ्याने नमूद केले. कडू यांची प्रकृती लवकर सुधारावी अशी प्रार्थनाही काही नेटकऱ्यांनी केली. कडू यांनी साहेबांना धोका दिला, त्यांची ही कृती प्रहारच्या कार्यकर्त्यांनाही आवडली नसल्याचे एका शिवसैनिकाने मोठी पोस्ट टाकून आपल्या भावना व्यक्त केल्या.