विश्वासात घेतलं नाही, म्हणून…; माजी मंत्री बच्चू कडूंनी घेतला वेगळा निर्णय, शिंदे-फडणवीसांना धक्का
अमरावती – राज्यात आगामी काळात शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकीपूर्वी माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांनी घेतलेल्या निर्णयानं राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला धक्का बसला आहे.
आगामी विधान परिषदेच्या पाचही जागा कडू यांच्या प्रहार संघटनेने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरकारमध्ये राहूनही बच्चू कडू यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
याबाबत बच्चू कडू म्हणाले की, येणाऱ्या ३० जानेवारीला राज्यात होणाऱ्या ५ विभागीय पदवीधर-शिक्षक मतदारसंघात प्रहार संघटनेकडून उमेदवार उभे केले जाणार आहेत. मराठवाड्यातून शिक्षक मतदारसंघात डॉ. संजय तायडे, किरण चौधरी, अमरावती आणि नरेशशंकर कौंडा, कोकण, अतुल रायकर नागपूर विभागासाठी तर वकील सुभाष झगडे हे नाशिक विभागातून निवडणूक लढणार आहेत. मेस्टा आणि प्रहार संघटना मिळून या निवडणुका लढवणार आहे. यातील १-२ जागा कुठल्या परिस्थितीत विजयी होणार असा दावा त्यांनी केला.
तसेच आम्ही याबाबत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांना कल्पना दिली होती. या मतदारसंघात आम्ही गेल्या ३ वर्षापासून मेहनत घेतोय. आम्ही मतदार नोंदणी केली आहे. त्यामुळे आम्हाला विचारात घेऊन उमेदवार द्यावेत जेणेकरून प्रहार-भाजपा-शिवसेना अशी युती करावी. परंतु त्यांचा काही निरोप आला नाही. त्यामुळे पाचही विभागात उमेदवार उभा करण्याचा निर्णय आम्ही घेतला. मैत्रीपूर्ण या लढती लढू असं बच्चू कडू यांनी म्हटलं.
दरम्यान, पाचही उमेदवार अर्ज भरतील. आम्हाला विश्वासात घेतले नाही म्हणून आम्ही पाचही जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला. अर्ज भरल्यानंतर पुढे काही चर्चा झाली तर पाहू अन्यथा सगळ्या जागा लढण्यावर आम्ही ठाम आहोत. यातील १-२ जागा हमखास येतील. त्याठिकाणी प्रहारचा तिसरा आमदार निवडून येईल असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला.
विधान परिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून त्यात शिक्षक-पदवीधर मतदारसंघाचा समावेश आहे. नाशिक, अमरावती पदवीधर, औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघासाठी ही निवडणूक आहे. येत्या ७ फेब्रुवारीला विधान परिषदेच्या ५ सदस्यांची मुदत संपणार आहे. १२ जानेवारीपर्यंत या निवडणुकीत अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे. ३० जानेवारीला मतदान आणि २ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.