सार्वत्रिक निवडणुकीत 80 टक्के मतदानाचे उद्दिष्ट ठेवून व्यापक जनजागृती करा : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
नांदेड दि. १ : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वांनी मतदान केलं पाहिजे. यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न करून नांदेड लोकसभा मतदारसंघात 80 % च्यावर मतदार मतदान करतील हे उद्दिष्ट ठेवून युवक, युवती व नागरिकांच्या सहभागातून यापूर्वी मतदान कमी झाले आहे अशा क्षेत्रात सर्व लोकमाध्यमे,सामाजिक माध्यमे व प्रत्यक्ष संवादातून मतदानाचा टक्का वाढवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज स्वीपच्या बैठकीत केले.
नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल आणि नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे आयुक्त महेश कुमार डोईफोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वीप कक्षाच्या सदस्यांची आज बैठक महानगरपालिकेच्या सभागृहात पार पडली. यावेळी गाव व तालुकास्तर या ठिकाणी स्वीप कक्षाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती संबंधित तालुक्याचे प्रमुख, तहसीलदार, गटशिक्षणाधिकारी आणि संबंधित सदस्यांनी दिली.
नागरी मतदार मतदान करण्यासाठी फारसे उत्सुक नसल्याचे या सादरीकरणांमध्ये दर्शविण्यात आले. ज्या ठिकाणी मतदान अत्यंत कमी झाले अशा ठिकाणांची नोंद घेऊन त्या त्या ठिकाणी आयोजित करावयाचे कार्यक्रम, लोकमत अनुकूल करणे,माध्यमांचा वापर, प्रत्यक्ष भेटी, गृह संवाद अशा विविध उपक्रमातून कक्षाचे सदस्य कार्य करीत आहेत.
देगलूर, भोकर ,नांदेड ,कंधार, लोहा, मुखेड, किनवट ,माहूर या तालुक्यांनी आपापल्या तालुक्यात करीत असलेल्या कामाचे सादरीकरण केले. प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे ,माध्यमिकचे शिक्षणाधिकारी माधव सलगर, योजना विभागाचे शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे यांनी शालेय विद्यार्थी, कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थी आणि गावकऱ्यांच्या सहभागाबद्दल माहिती दिली.
मतदार जनजागृती मोहिमेत किनवटचे प्राध्यापक शाहीर मार्तंड कुलकर्णी यांनी दुर्गम भागातील गावांना भेट देऊन जनसंवाद कार्यक्रम आखला आहे, याची माहिती दिली.असंघटित क्षेत्रातील कामगारांना सुट्टी देण्याबाबत संबंधित आस्थापनांच्या मालकांना भेटून विनंती केली आहे. स्थलांतरामुळे जे मतदार बाहेरगावी राहतात त्यांना गावात आणण्यासाठी उपाययोजना सहायक जिल्हाधिकारी किनवट करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी, वरिष्ठ महाविद्यालय विद्यार्थी यांचा यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग घेण्यात येत आहे. प्रतिज्ञा, रिंगण, पथनाट्य आई-बाबांना संकल्प पत्र ,भटक्यांच्या पालांच्या ठिकाणी भेटी, लग्नकार्यात आवाहन, मंदिरात आवाहन, सामाजिक माध्यमे, पथनाट्य, छोटे छोटे व्हिडिओ तयार करून रंजकपणे माहिती देणे घोषवाक्य आदी तयारी करण्यात येत आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल नव मतदार युवक युवती मतदान करण्यासाठी उत्साहीत असतात. त्यांच्यातील उत्साहाला आपण सर्वांनी बळ द्यावे. यासाठी सर्व कनिष्ठ महाविद्यालय ,वरिष्ठ महाविद्यालय, विविध शैक्षणिक संस्था, तरुणांचे सामाजिक संघटन आदींना यात सहभागी करून घ्यावे. संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक यांचा यामध्ये सहभाग घेऊन मतदान वाढविता येईल.
महेश कुमार डोईफोडे महानगरपालिका आयुक्त शहरातील डॉक्टर्स, लायन्स क्लब, वेगवेगळ्या सामाजिक संस्थांना मतदान जनजागृती अभियानात समाविष्ट करून घेण्यात येत आहे. मतदान करणाऱ्या रुग्णांना डॉक्टरची ट्रीटमेंट मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लायन्स क्लबच्या दवाखान्यात तशाच सोयी करण्याबाबत प्रयत्न आहेत. महानगरपालिका पातळीवर सर्व बाबतीत जनजागृती मोहीम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे.