तरुणांनी मतदान करुन आपले कर्तव्य पूर्ण करावे सीईओ मिनल करनवाल
नांदेड,2- प्रथमच मतदार म्हणून तुमचे नाव मतदार यादीत आले आहे अशा युवकांनी मतदान करुन आपले कर्तव्य पूर्ण करावे, असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मतदान जनजागृती कक्षाच्या प्रमुख मिनल करनवाल यांनी केले.
16- नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मतदानासाठी जनजागृती महाविद्यालयातील नवमतदारांना मतदानासाठी आवाहन करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल ह्या महाविद्यालयात जावून युवक-युवतींशी संवाद साधत आहेत. आज मंगळवार दिनांक 2 एप्रिल रोजी शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात तीनशे नवमतदारांना मतदानासाठी त्यांनी आवाहन केले. यावेळी मंचावर प्राचार्य डॉ. सुधीर शिवणीकर, उपप्राचार्य डॉ. कल्पना कदम, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी माधव सलगर यांची उपस्थित होती.
मतदान आवश्यकता व गरज याविषयी विविध उदाहरणे देवून मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी मतदानाचे महत्त्व पटवून दिले. याप्रसंगी युवकांनी विचारलेल्या प्रश्नांना अत्यंत समर्पक दाखले देत सीईओ करनवाल यांनी नवमतदारांचे समाधान केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक राजेश कुलकर्णी यांनी केले तर आभार शिक्षण विस्तार अधिकारी हनुमंत पोकले यांनी मानले केले. कार्यक्रमाची सांगता सारिका आचमे यांनी मतदार प्रतिज्ञेने केली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय भालके, आर.जी. कुलकर्णी, बालासाहेब कच्छवे, प्रलोभ कुलकर्णी, बाबुराव जाधव, माणिक भोसले, लता उदबुके, डॉ विजय तरोडे, डॉ परविंदर कौर, महाजन कोल्हापूरे, साईनाथ चिद्रावार, आशा घुले, डॉ कुलकर्णी, भुजंग करडखेडकर, अनिल देशपांडे व मयुरेश जोशी यांनी परिश्रम घेतले.
स्वीपच्या नोडल अधिकारी सीईओ मिनल करनवाल यांच्या निर्देशानानुसार जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील युवकांशी दररोज संवाद साधण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेचे अधिकारी, प्राध्यापक आदींना त्यांनी सूचना दिल्या आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी हे देखील काही महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. यामध्ये आज 3 एप्रिल रोजी सायन्स कॉलेज नांदेड, 4 एप्रिल रोजी यशवंत महाविद्यालय नांदेड, 5 एप्रिल रोजी पीपल्स कॉलेज नांदेड, 6 एप्रिल रोजी प्रतिभा निकेतन महाविद्यालय नांदेड, 8 एप्रिल रोजी बळीराम पाटील महाविद्यालय किनवट,
10 एप्रिल रोजी दिगंबरराव हिंदू महाविद्यालय भोकर, 12 एप्रिल रोजी श्री दत्त कला व विज्ञान महाविद्यालय हदगाव, 13 एप्रिल रोजी लालबहादूर शास्त्री महाविद्यालय धर्माबाद, 15 एप्रिल रोजी अण्णाभाऊ साठे महाविद्यालय मुखेड, 16 एप्रिल रोजी देगलूर महाविद्यालय देगलूर, 18 एप्रिल रोजी श्री शिवाजी महाविद्यालय, नवरंगपुरा तालुका कंधार, 19 एप्रिल रोजी संत गाडगे महाराज महाविद्यालय लोहा व 20 एप्रिल रोजी जनता महाविद्यालय नायगाव या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी मतदान जनजागृती विषयी संवाद साधला जाणार आहे.