ग्राम स्वच्छतेत हाडोळीचे यश 11 मार्च रोजी नाशिक येथे पुरस्कार वितरण सोहळा इतर गावांनी हाडोळीचा आदर्श घ्यावा- सीईओ मिनल करनवाल
नांदेड,7- संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात नांदेड जिल्ह्यातील हाडोळी तालुका भोकर या ग्रामपंचायतीची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. अशी माहिती जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ सांनी दिली आहे. येत्या 11 मार्च रोजी नाशिक येथे होणा-या कार्यक्रमात पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानातंर्गत ग्रामस्थांनी स्वच्छतेत सातत्य राखावे तसेच घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाची कामे गुणवत्ता पूर्ण करून हाडोळी ग्रामपंचायतीचा आदर्श सर्व ग्रामपंचायतीने घ्यावा, असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी केले आहे.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान 2018-19, 2019 -20 तसेच 2020-21 व 2021-22 (एकत्रित एक स्पर्धा) या तीन वर्षाच्या कालावधीसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेमध्ये प्रथम, व्दितीय व तृतीय पुरस्कार प्राप्त ठरलेल्या ग्रामपंचायती व विशेष पुरस्कारासाठी पात्र ठरलेल्या ग्रामपंचायतीचा पुरस्कार वितरण सन्मान सोहळा शुक्रवार दिनांक 11 मार्च रोजी महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिकी प्रशिक्षण व संशोधन संस्था (मित्रा) नाशिक येथे आयोजित केला आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी 2020-21 व 2021-22 (एकत्रित एक स्पर्धा) पुरस्कारात ग्रामपंचायत हाडोळीची निवड झाली आहे.