निवडणुकीसाठी बूथ स्तरावर बारकाईने नियोजन आवश्यक – माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे प्रतिपादन
नांदेड प्रतिनिधी – आगामी लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक केव्हाही जाहीर होण्याची शक्यता आहे, कोणत्याही निवडणुकीचा ७० टक्के निकाल हा बूथ कमिटीच्या नियोजनावरच अवलंबून असतो, त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी सज्ज राहून काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बूथ पातळीवरचे अतिशय बारकाईने नियोजन करणे आवश्यक आहे,असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आज येथे केले आहे.
नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासाठी मातोश्री मंगल कार्यालय कौठा येथे बुधवारी ( दि.७) आयोजित बूथ स्तरावरील बीएलए आणि बुथ कमिटी सदस्यांच्या प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार भास्कराव पाटील खतगावकर हे होते. तसेच नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आ. मोहनअण्णा हंबर्डे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभिजित सपकाळ, ॲड. सुरेंद्र घोडजकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा,काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, वरिष्ठ उपाध्यक्षा डॉ. मिनलताई खतगावकर, जिल्हाध्यक्षा कविता कळसकर ,शहराध्यक्षा प्रा.ललिता शिंदे, माजी महापौर अब्दुल सत्तार, सरजितसिंग गिल, माजी उपमहापौर शमीम अब्दुला, अब्दुल गफुर, जे.पी.पाटील, विठ्ठल पावडे, प्रवक्ते अनिल मोरे, माजी जि.प.सदस्य तथा नांदेड काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष मनोहर शिंदे, गंगाप्रसाद काकडे,काँग्रेस मागासवर्गीय विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा.मनोहर पवार, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष डॉ. गंगाधर सोनकांबळे, लोहा काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष शरद पवार, वाघाळा ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष सतिश बसवदे, नितीन पाटील झरीकर,बालाजी चव्हाण, सुदेश ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
आगामी निवडणुका अतिशय जवळ आल्या आहेत, त्यासाठी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सज्ज राहणे आवश्यक आहे असे नमूद करून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण पुढे म्हणाले की, काही ठिकाणी कार्यकर्ते काहीच काम न करता सर्व काही ओके आहे असे अगदी ठणकावून सांगतात. निकालाच्या दिवशी खरी परिस्थिती उघडकीस येते. निवडणुकीच्या नियोजन संदर्भात आपण काहीच नाही केले तरी, विरोधक मात्र वेगाने कामे करतात, त्यासाठी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभिजित सपकाळ यांनी याठिकाणी चित्रफितीच्या माध्यमातून जे सविस्तर मार्गदर्शन केले आहे. त्यानुसार सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करून बूथ स्तरावरील मतदार याद्या तयार करण्यापासून आवश्यक ती सर्व कामे वेगाने करावीत.
याठिकाणी चित्रफितीच्या माध्यमातून दाखविण्यात असलेली शहर विकासाची ठळक कामे ही वस्तुस्थिती दर्शक आहेत, त्यामध्ये कुठलाही खोटेपणा नाही, तरीही विरोधक मात्र कुठलीही दिसणारी ठळक कामे नसतानाही खोटे बोल, पण रेटून बोल या पध्दतीने प्रसिध्दी करीत असतात, आपली मोठ्या प्रमाणातील चांगल्या विकास कामांकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करीत कुठेतरी एखाद्या कामातील त्रुटी शोधून काढून चुकीच्या पद्धतीने गवगवा करतात, अशावेळी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करून त्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी तयार राहावे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बूथ पातळीवरील एवढ्या बारकाईने नियोजनाचे काम हाती घेणारा आपला नांदेड जिल्हा हा राज्यातील पहिलाच असावा, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
प्रारंभी प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करताना आ. मोहनअण्णा हंबर्डे यांनी आपले लाडके सक्षम नेतृत्व राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शन आणि नेतृत्वाखाली दक्षिण मतदार संघात केलेल्या विकास कामांची माहीती देत या शिबिराच्या आयोजनामागील पक्षाची भूमिका विषद केली. त्यानंतर प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभिजित सपकाळ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीसाठी कशा प्रकारचे सूक्ष्म नियोजन करणे आवश्यक आहे, हे चित्रफितीच्या माध्यमातून सविस्तररित्या मार्गदर्शन केले. तसेच देशहित तसेच पक्षासाठी पुढील ७५ दिवस स्वतःला झोकून देऊन काम करण्याची शपथ त्यांनी यावेळी सर्वाँना दिली.
तसेच यावेळी नांदेड तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे, लोहा तालुका अध्यक्ष शरद पवार,शहराध्यक्षा प्रा. ललिता शिंदे, मोरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सुरेख सुत्रसंचालन प्रा. संतोष देवराये यांनी केले.
राज्यात सत्ता असो अथवा नसो, परंतु राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मागील काही वर्षात झालेल्या विकास कामांची आकर्षक चित्रफीत यावेळी दाखविण्यात आली. ही सर्व कामे पाहून उपस्थित सर्वच जण भारावून गेल्याचे चित्र देखील पहावयास मिळाले.