काँग्रेसच्या बुथ कमिटी प्रशिक्षण कार्यक्रमाला आजपासून प्रारंभ
नांदेड, दि. ४ फेब्रुवारी २०२४: काँग्रेस पक्षाच्या विधानसभानिहाय बुथ कमिटी प्रशिक्षण कार्यक्रमाला आजपासून प्रारंभ होत असून, पहिल्या टप्प्यात ५, ६ व ७ फेब्रुवारी रोजी भोकर, नायगाव, मुखेड, देगलूर आणि नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील बुथ कमिट्यांचे प्रशिक्षण शिबीर होणार आहे.
नांदेड जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीने दिलेल्या माहितीनुसार, राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी ५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता ओमकार मंगल कार्यालय, उमरी रोड, मुदखेड येथे भोकर विधानसभा मतदारसंघ तर दुपारी ३ वाजता जयराज पॅलेस मंगल कार्यालय, नायगाव येथे नायगाव विधानसभा मतदारसंघातील बुथ कमिट्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम होईल.
मंगळवारी ६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता शाहीर अण्णाभाऊ साठे महाविद्यालय, मुखेड येथे मुखेड विधानसभा मतदारसंघ तर दुपारी ३ वाजता सिद्धेश्वर मंगल कार्यालय, देगलूर येथे देगलूर विधानसभा मतदारसंघातील बुथ कमिट्यांचे प्रशिक्षण शिबीर होईल. बुधवारी ७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता मातोश्री मंगल कार्यालय, कौठा, नांदेड येथे नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील बुथ कमिट्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम होईल. या प्रशिक्षणासाठी प्रत्येक बुथवरून पाच सदस्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. संबंधित बुथ कमिटी सदस्यांनी आपल्या विधानसभा मतदारसंघाच्या शिबिराला आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अमरनाथ राजूरकर आणि जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांनी केले आहे.