बालकांच्या सुपोषणासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यशाळा संपन्न
नांदेड,4- सुपोषणासाठी प्रशिक्षणाद्वारे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौशल्यवर्धन करण्यात येईल. त्यानंतर प्रत्यक्ष बालकांच्या कुपोषणासाठी जिल्ह्यात उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी आयआयटी मुंबईच्या आहारशास्त्र विभागाने हेल्थ स्पोकन ट्युटोरियल कोर्स तयार केला आहे, अशी माहिती नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दिली आहे. हेल्थ स्पोकन ट्युटोरियल वापरून आहाराद्वारे कुपोषण दूरीकरण कार्यशाळा आज रविवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात संपन्न झाली.
या कार्यशाळेचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महिला व बालविकास विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, आयआयटी मुंबईचे डॉ. देवजी,
सामान्य रुग्णालयातील डॉ. विद्या झिने, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हिराणी, डॉ. शिवशक्ती पवार, डॉ. प्रवीण मुंडे, डॉ. संदेश जाधव, डॉ. सत्यनारायण मुरमुरे आदींची मंचावर उपस्थिती होती.
जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने कुपोषित बालकांच्या पोषणासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून यासाठी आयआयटी मुंबईच्या आहारशास्त्र विभागाशी सामंजस्य करार करण्यात आला आहे.
या संदर्भाने अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी पहिली कार्यशाळा संपन्न झाली.सदर कार्यशाळेची प्रस्तावना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केली व पोषणाचे महत्व विशद केले.आयआयटी, मुंबई येथील आहार तज्ञ डॉ. देवजी व टीम यांनी हेल्थ स्पोकन कोर्स तयार केला आहे. याद्वारे आशा, अंगणवाडी वर्कर, समुदाय आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांचे कौशल्य वर्धन केले जाणार आहे. यामध्ये शंभर मोडूयल तयार करण्यात आले आहेत. त्याद्वारे ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून लहान बालकांच्या आहाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. स्तनपानाच्या सुयोग्य पद्धती बाबत तज्ञांद्वारे मार्गदर्शन करून आरोग्य काम करणाऱ्या सर्वांचे कौशल्य वृधिंगत केले जाणार आहे.
जिल्ह्यातील शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांच्या कुपोषणमुक्तीसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना, घेण्यात येणारे कार्यक्रम व राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाविषयी माहिती देण्यात आली. तसेच कर्मचाऱ्यांनीही काम करत असताना योग्य आहार घेणे महत्त्वाचे आहे.
आपला आहार कसा असावा, आपण काय खात आहोत. त्यात काय कमतरता आहे, ज्यामुळे आपल्याला आजार होत आहेत. ते कसे कमी करता येईल याबाबतही या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी नांदेड जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय येथील वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, जिल्हास्तरीय अधिकारी, पर्यवेक्षक व तालुका स्तरीय कर्मचारी तसेच महिला व बालकल्याण विभागातील प्रकल्प अधिकारी व पर्यवेक्षकासह जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी सुभाष खाकरे, जिल्हा कार्यक्रम व्यावस्थापक जुनेद सलीम, जिल्हा लेखा अधिकारी बाळासाहेब चौधरी, जिल्हा सनियंत्रण व मूल्यमापन अधिकरी अनिल कांबळे आदी उपस्थित होते.