शिक्षण
भाषा ही अभिव्यक्तीचे सशक्त माध्यम असून भाषेमुळेच सामाजिक आंतरक्रिया स्थापित होत असतात
नांदेड,18- भाषा ही अभिव्यक्तीचे सशक्त माध्यम असून भाषेमुळेच सामाजिक आंतरक्रिया स्थापित होत असतात. माणसामाणसात संवाद घडून येतो. मानवी जीवन व्यवहाराचे सर्जनशील वहन करणारी भाषा ही जननी असते. मराठी भाषेने संत ज्ञानेश्वर तुकोबारायापासून अलीकडील विवेकवादी लेखन परंपरेतील सुधारक दिले आहे असे प्रतिपादन लेखक डॉ. विलास ढवळे यांनी आज केले .
भोकर येथील दिगंबरराव बिंदू महाविद्यालयातील भाषा संकुलाच्या वतीने आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य संजय काळे हे होते. मंचावर मराठी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. जे. टी. जाधव जिल्हा परिषदेचे जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्यवहारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी ढवळे यांनी परस्परसाहचर्य, परस्पर संवाद आणि विद्यार्थ्यांसाठी खुली असलेली व्यापक दालने या संदर्भात चर्चा केली. विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर विवेकवादी लेखन वाचले पाहिजे, समाज अभ्यासला पाहिजे आणि सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून आपण जागरूक असले पाहिजे असे सांगून अनेक राजकीय आणि सामाजिक वास्तव मांडले. यावेळी त्यांनी महाविद्यालयीन जीवनातील प्रसंगावर एक खुमासदार कथा सांगितली.
प्रारंभी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉ.जे.टी .जाधव यांनी केले. मराठी भाषा ही अभिजात भाषा असून तिचे संवर्धन होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मराठी भाषा संवर्धनासाठी विभागाच्या वतीने करण्यात येत असलेल्या कार्यक्रमांची उपक्रमांची माहिती त्यांनी यावेळी दिली.
मिलिंद व्यवहारे यांनी माध्यम क्षेत्रातील अनेक अनुभवांची नोंद येथे मांडली. आकाशवाणी सारख्या माध्यमाने जनमानस घडविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे दाखले दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय काळे यांनी मराठी ही आपली मायबोली असून ती अनेक अंगांनी विकसित झालेली आहे. भाषा अधिकाधिक सशक्त आणि प्रभावी होण्यासाठी शासन तसेच नागरिकांनी जागरूकपणे प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे म्हटले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन डॉ. राजेंद्र चौधरी यांनी केले.
कार्यक्रमास डॉ. एच.आर.जवळगे, डॉ.माधव बिरादार, आर.ए. होगे, प्रा. प्रशांत टाके, डॉ.कमल फोले, प्रा.नागेश सक्करगे, डॉ.रामचंद्र भिसे, डॉ.दीपक पवार, प्रा. संग्राम पंडित, प्रा.करपे यांच्यासह संकुलातील विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.