सुपोषित नांदेड करिता जिल्ह्यात विशेष मोहीम; आयआयटी मुंबईच्या आहारशास्त्र विभागाच्या सहकार्याने
नांदेड 5- नांदेड जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास आणि आरोग्य विभाग यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील कुपोषित बालकांच्या पोषणासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी आयआयटी मुंबईच्या आहारशास्त्र विभागाशी सामंजस्य करार करण्यात आला आहे. यातून सुपोषित नांदेडकरिता विशेष अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती, नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दिली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल जिल्हा परिषदेत रुजू झाल्यापासून विद्यार्थ्यांची गुणवत्तावाढ तसेच कुपोषणमुक्तीसाठी विशेषात लक्ष घातले आहे. यासाठी शिक्षकांना वेध प्रशिक्षण दिले जात आहे. तर कुपोषणासाठी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेतून आदिवासी भागातील गरोदर मातांना सकस आहार देण्यावर भर दिला जात आहे. यावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र व्हाट्सअप ग्रुपही तयार केला आहे. आता नांदेड जिल्ह्यातील शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांच्या कुपोषणमुक्तीसाठी पाऊल उचलले आहे. यासाठी त्यांनी आयआयटी मुंबई यांच्या सोबत सामंजस्य करार ही केला आहे.
बालकातील कुपोषण शोधण्यासाठी नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे दर पाच वर्षांनी करण्यात येतो. सन 2020 मध्ये झालेल्या सर्वेक्षणात नांदेड जिल्ह्यात वजनाप्रमाणे उंची कमी असणारे 19% बालके, वयाप्रमाणे वजन कमी असणारे 35% बालके आढळली. या सर्वेक्षणात नांदेड जिल्ह्यात पाच वर्षाखालील मुलांचे कुपोषण जास्त असल्याचे आढळले. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी ठोस पाऊल उचलले आहे. आता आयआयटी मुंबई यांच्या समन्वयाने जिल्ह्यात सुपोषणासाठी काम केले जाणार आहे.
यामध्ये आयआयटीच्या माध्यमातून जिल्ह्यातील आशा व अंगणवाडी कर्मचारी यांचे आहारशास्त्रामध्ये कौशल्यवर्धन केले जाणार आहे. तसेच गरोदर माता, स्तनदा माता व त्यांच्या कुटुंबीयांचे समुदेशनही केले जाणार आहे. यासंदर्भाने आरोग्य तसेच महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची सीईओंनी बैठकीही घेतली. या उपक्रमासाठी दोन्ही विभागातील 250 अधिकारी-कर्मचाऱ्यांचे आयआयटी मुंबई यांच्याकडून प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर प्रायोगिक तत्त्वावर कुपोषित बालकांना सुपोषित करण्यासाठी गावस्तरावर विशेष उपक्रम राबविण्यात येईल. या माध्यमातून नांदेड जिल्हा सुपोषित होईल असे मत, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी व्यक्त केले.
बालकातील कुपोषणाची कारणे
बालकाच्या कुपोषणाची कारणे पाहता यामध्ये बालकांना वेळेत स्तनपान न करणे, बालकांना चुकीच्या पद्धतीने स्तनपान करणे, बाळ जन्मल्या नंतर एक तासाच्या आत स्तनपान न करणे, बाळाच्या आहाराबद्दल विविध अंधश्रद्धा बाळगून त्या पद्धतीने बाळाच्या आहारात बदल करणे, बाळाला सहा महिन्यापर्यंत स्तनपान न करणे आदी बालकातील कुपोषणाची कारणे आहेत.