मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त; तिघांना अटक, जिल्ह्यात खळबळ
रायगड: जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातून मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. माणगाव पोलिसांनी स्फोटकांची अवैधपणे वाहतूक करणाऱ्या बोलेरो गाडीला जप्त केले आहे. या वाहनातून तब्बल १२ लाख रुपयांच्या स्फोटकांची वाहतूक केली जात होती. या गाडीमध्ये डिटोनेटरसह जिलेटिन कांड्या सापडल्या आहेत. ही धडाकेबाज मोठी कारवाई रायगड पोलिसांनी केली आहे. या कारवाईत माणगाव पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
यापूर्वी १९९३ साली झालेल्या मुंबईतील बॉंम्बस्फोट प्रकरणी शेखाडी येथे स्फोटके जप्त करण्यात आली होती. त्यावेळच्या काळ्या आठवणी पुन्हा जागा झाल्या.अवैध स्फोटक पदार्थांची वाहतूक एका बोलेरोमधून केली जात असल्याची गोपनिय माहिती माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक राजेद्र पाटील यांना सूत्रांकडून मिळाली होती. माहिती मिळताच शनिवार दि. २३ डिसेंबर रोजी सकाळी पोलीस पथक माणगाव-निजामपुर मार्गावर कारवाई करण्याकरता रवाना झाले. या मार्गावर पांढऱ्या रंगाची बोलेरो संशयित दिसुन आली. यानंतर पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी बोलेरो थांबून झडती घेतली असता गाडीमध्ये १०,८०० किमतीचे एकूण ४ बॉक्स इलेक्टीक डिटोनेटर आणि १,७०,००० किमतीचे जिलेटीन काड्यांचे ५० बॉक्स मिळून आले.
याबाबत विचारणा केली असता आरोपींकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात अली. तसेच याआधी येताना पाली आणि पेण येथे देखील स्फोटकं दिली असल्याची माहिती पकडलेल्या आरोपींनी दिली. या माहितीच्या आधारे माणगाव पोलिसांनी पाली आणि पेण येथून आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून एकुण १५०० किलो वजनाचे जिलेटीन आणि डेटोनिटर बॉक्स, असे स्फोटके हस्तगत करण्यात आली आहेत. माणगाव पोलिसांनी हि धडाकेबाज कारवाई केली असून आरोपी विक्रम गोपाळदास जाट, विठ्ठल तुकाराम राठोड ,राजेश सुभेसिंग यादव यांच्या विरोधात माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या सर्वांचा सूत्रधार असलेल्या आरोपीचा शोध सुरु असून यासाठी चार पथके तयार करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे.