स्वतःच्या इमारती नसलेल्या 528 अंगणवाडी केंद्र आता शाळेच्या परिसरात स्थलांतरित – मीनल करनवाल
नांदेड,17- जिल्ह्यातील स्वतःच्या इमारती नसलेल्या 528 अंगणवाडी केंद्र आता शाळेच्या परिसरात स्थलांतरित करण्यात आल्याची माहिती नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दिली आहे.
नांदेड जिल्ह्यात एकूण 3 हजार 722 अंगणवाडी केंद्र मंजूर असून, त्या कार्यान्वित आहेत. यापैकी 2 हजार 379 अंगणवाड्यांना स्वतःच्या इमारती आहेत. परंतु 1 हजार 343 अंगणवाड्यांना स्वतःच्या इमारती नाहीत. त्यामुळे या अंगणवाडी गावातील समाज मंदिर, ग्रामपंचायत तसेच भाड्यांच्या इमारतीमध्ये भरतात. ही बाब मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निदर्शनात आल्यानंतर त्यांनी बैठका घेण्यास सुरुवात केली. तसेच एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त यांनी ज्या अंगणवाड्यांना इमारती नाहीत अशा अंगणवाड्या शालेय इमारतीत रिक्त खोल्यांमध्ये स्थलांतरित करण्यासंदर्भात पत्र दिले आहे.
या अनुषंगाने गटशिक्षणाधिकारी व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी आढावा घेतला. ज्या शाळेमध्ये वर्ग खोला रिक्त आहेत अशा शाळांची माहिती घेतली. अशा एकूण 528 अंगणवाड्या शाळेमध्ये स्थलांतरित करण्यात आल्या आहेत. यामध्ये अर्धापूर तालुक्यात-14, भोकर- 24, बिलोली- 27, देगलूर- 36, धर्माबाद- 16, हादगाव- 71, हिमायतनगर-8, कंधार- 51, किनवट- 31, लोहा- 62, माहूर- 16, मुदखेड- 19, नायगाव- 43, मुखेड- 44, नांदेड 35 तर उमरी तालुक्यात 31 अंगणवाड्या असे एकूण 528 अंगणवाड्यांचा यात समावेश आहे. उर्वरित 815 अंगणवाड्यांचेही हळूहळू शाळेत स्थलांतर करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल कनवाल यांनी दिली आहे. या अनुषंगाने उप मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम- कदम, बाल विकास प्रकल्प अधिकारी व गट शिक्षणाधिकारी शाळेचे सर्वेक्षण करून इतर अंगणवाड्याही लवकरच शाळेला जोडण्यासाठी नियोजन करत आहेत.