नवनीत राणांनी घेतली अजित पवारांची भेट; म्हणाल्या, ”राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळत आला आहे”
अमरावती : उपमुख्यमंत्री अजित पवार एक दिवसीय अमरावती दौऱ्यावर आले असून शनिवारी खासदार नवनीत राणा यांनी त्यांची भेट घेतली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या सुरेखा ठाकरे यांच्या येथील निवासस्थानी ही भेट झाली. लोकसभा निवडणुकीच्या हालचालींना वेग आलेला असताना नवनीत राणा यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चा रंगली आहे.
”मी युवा स्वाभिमान पक्षाची खासदार आहे. हा पक्ष एनडीएचा घटक पक्ष आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने माझ्या उमेदवारीला पाठिंबा दिला होता. आजही आम्ही एकत्रच आहोत. मला युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष रवी राणा यांच्याकडे उमेदवारी मागावी लागेल. त्यानंतर ते कुणाचा पाठिंबा घ्यायचा याविषयी निर्णय घेतील. आम्ही अजित पवार यांच्याबरोबर नेहमीच होतो. त्यांनी आपल्याला उमेदवारी दिली होती. त्यांची मी ऋणी राहणारच आहे”, असे नवनीत राणा यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
आपण राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढणार का, असे विचारले असता नवनीत राणा म्हणाल्या, ”मी एनडीएमध्ये आहे. येणाऱ्या काळात जनतेला माझ्याकडून जे अपेक्षित असेल, ते आपण करणार आहोत”.
राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील फुटीनंतर खासदार नवनीत राणा यांनी प्रथमच अजित पवार यांची भेट घेतली. आगामी निवडणुकीतील भूमिकेविषयी त्यांच्यात चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.