मुलींच्या सक्षमीकरणासह मुलींना लखपती बनवणाऱ्या लेक लाडकी योजनेचा लाभ घ्यावा मीनल करनवाल यांचे आवाहन
नांदेड,8- मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलीच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यू कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे, शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे, एकूणच मुलींच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनाच्या वतीने लेक लाडकी योजना राबविण्यात येत असून लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले आहे.
राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने सदर योजना सुरू करण्यासंदर्भात दिनांक 30 ऑक्टोबर 2023 रोजी शासन निर्णय काढण्यात आला आहे. पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर 5 हजार रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यानंतर 6 हजार रुपये, सहावीत गेल्यानंतर 7 हजार रुपये, अकरावीत गेल्यावर 8 हजार रुपये. अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर 75 हजार रुपये, अशा रीतीने एकूण त्या मुलीस 1 लाख 1 हजार रुपये एवढा लाभ मिळणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी सांगितले.
ही योजना 1 एप्रिल 2023 नंतर कुटुंबात जन्मणाऱ्या एक अथवा दोन मुलींना त्याचप्रमाणे एक मुलगा व एक मुलगी असलेल्या मुलीला या योजनेचा लाभ मिळणार आहे. दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी आपत्य जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल. मात्र आई किंवा वडिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. 1 एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगी किंवा मुलगा व त्यानंतर दुसरी मुलगी किंवा जुळ्या मुली जन्माला आल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळेल. जुळ्या दोन्ही मुलींना स्वतंत्र लाभ देण्यात येईल. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयापेक्षा जास्त नसावे.
यासाठी लाभार्थ्यांनी गावातील अंगणवाडी केंद्र किंवा तालुका स्तरावरील एकात्मिक बाल विकास कार्यालयात संपर्क साधून प्रस्ताव सादर करावेत तसेच लेक लाडकी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, महिला व बालकल्याण विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-कदम यांनी केले आहे.