दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रा यंदा जानेवारी 2024 मध्ये
नांदेड, 6- दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रा यंदा जानेवारी 2024 मध्ये येत असून, यात्रेच्या पूर्व तयारी संदर्भात बुधवार दिनांक 6 डिसेंबर रोजी लोहा पंचायत समिती येथे जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वतयारी बैठक घेण्यात आली. यावेळी उप विभागीय अधिकारी शरद मंडलिक, तहसीलदार शंकर लाड, उप विभागीय पोलीस अधिकारी थोरात, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, नारायण मिसाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे आदींची यावेळी उपस्थित होती.
श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत जिल्हा परिषदेच्या वतीने विविध स्पर्धा तसेच केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची माहिती असलेले स्टॉल उभारण्यात येतात. या यात्रेच्या नियोजना संदर्भात आज सीईओ करनवाल यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांचा आढावा घेऊन यात्रा पूर्वनियोजनाची बैठक घेतली. यावेळी त्यांनी यात्रेदरम्यान घनकचरा व्यवस्था करणे, विद्युत वाढीव पोल घेणे, अंतर्गत रस्ते मजबूती करणे ईत्यादी बाबत प्रस्ताव तयार करून निधी मागणी करण्याच्या सुचना दिल्या. जिल्हा परिषद व लोहा पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी, एमएसईबीचे अधिकारी, उप अभियंता, विस्तार अधिकारी, ग्राम विकास अधिकारी आदींची यावेळी उपस्थिती होती. बैठकीनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी माळेगाव येथे यात्रा परिसरांची पाहणी केली.