दिशा सालियनच्या मृत्यूच्या दिवशी कुठे होते? आदित्य ठाकरेंनी सोडले मौन
दिशा सालियनच्या आत्महत्या प्रकरणात शिंदे गट आणि भाजपच्या नेत्यांकडून लक्ष्य करण्यात येत असलेले शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियान आत्महत्या प्रकरणात आपले मौन सोडले आहे.
दिशा सालियानचा मृत्यू झाला तेव्हा आपण रुग्णालयात होतो, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. आजोबांवर (रश्मी ठाकरे यांचे वडील) रुग्णालयात उपचार सुरू होते, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली. त्यामुळे कितीही आरोप केले तरी सत्य बाहेर येईल असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.
आदित्य ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. आम्ही सभागृहात मुख्यमंत्र्यांचा घोटाळा बाहेर काढला. त्यानंतर सरकारला विरोधी पक्षांचे म्हणणे ऐकायचे नाही, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला. आमच्यावर कितीही चौकशी लावली तरी आम्ही डगमगणार नाही, असेही आदित्य यांनी सांगितले.
दिशा सालियानची आत्महत्या झाली नसून तिची हत्या झाली असल्याचा दावा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला. विधानसभेत नितेश राणे यांनी दिशा सालियानचा मृत्यू झाला त्या पार्टीत कोण होते, सीसीटीव्हीचे फूटेज का गायब आहेत, व्हिजिटर बुकमधील पाने का फाडली गेली आहेत, असे प्रश्न उपस्थित करत नितेश राणे यांनी चौकशीची मागणी केली. तर, शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीने 44 वेळा फोन केलेली AU नावाची व्यक्ती कोण याची चौकशी करण्याची मागणी केली. त्याशिवाय, दिशा सालियान प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची मागणी गोगावले यांनी सभागृहात केली होती.
बुधवारी, नितेश राणे यांनी विधान भवनाच्या परिसरात पत्रकारांसोबत बोलताना आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली होती. आदित्य ठाकरे यांची नार्को चाचणी केल्यास दिशा सालियान मृत्यू प्रकरणातील सत्य बाहेर येईल असा दावा नितेश राणे यांनी केला.
दिशा सालियान प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्याकडून सातत्याने आदित्य ठाकरे यांच्यावर संशय व्यक्त केला जातो. दिशाने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचा आरोप राणे यांच्याकडून करण्यात आला होता. दिशावर अत्याचार करण्यात आला. त्यानंतर तीने या प्रकरणाची वाच्यता करू नये यासाठी तिची हत्या केली आणि त्याला आत्महत्येचे स्वरुप देण्यात आले असल्याचा आरोप राणे यांनी केला होता.