श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड एंड सिल्वर कप हॉकी स्पर्धेस प्रारंभ
नांदेड दि. 22 डिसेम्बर (रविंद्रसिंघ मोदी)
समस्त देशात सध्या प्रतिष्ठित नावोल्लेख होत असलेल्या अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड एंड सिल्वर कप हॉकी टूर्नामेंट स्पर्धेचे उद्धघाटन गुरुवार, दि. 22 डिसेम्बर रोजी खालसा हायस्कूल मिनी स्टेडियम येथे पार पडले. यंदाची ही स्पर्धा 49 वीं आहे. गुरुवारी दुपारी 12 वाजता सुमारास गुरुद्वारा तखत सचखंड श्री हजुर साहेबचे मुख्य जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी यांच्या शुभास्ते श्री गुरु गोबिंदसिंघजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गुरुद्वारा सचखंड हजुरसाहिबचे सहायक जत्थेदार संतबाबा रामसिंघजी, गुरुद्वारा श्री लंगर साहेबचे मुखी संतबाबा बलविंदरसिंघजी कारसेवा वाले, गुरुद्वारा मातासाहेब देवाजी येथील जत्थेदार संतबाबा तेजासिंघजी, गुरुद्वारा सचखंड बोर्डाचे प्रभारी अधीक्षक स. शरणसिंघ सोढी यांची उपस्थिती होती. तसेच निमंत्रित अतिथी म्हणून स. बरियाम सिंघ नवाब, स. नानकसिंघ घडीसाज, गुरुद्वाराचे सहायक अधीक्षक स. ठानसिंघ बुंगाई, माजी अधीक्षक स. रणजीतसिंघ चिरागिया, स. जोगिंदरसिंघ खैरा. प्रा. स. जुझारसिंघ सिलेदार, स. चांदसिंघ मुख्याध्यापक, डॉ हरदीपसिंघ खालसा यांची उपस्थिती होती.
प्रमुख अतिथींच्या हस्ते क्रीडाध्वज फडकावून स्पर्धेस सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथींनी मैदानात जावून सैफई हॉस्टल इटावा आणि डेक्कन हैदराबाद संघांच्या खेळाडूंचे परिचय करून सामना सुरु करवून दिला. यावेळी दुष्ट दमन क्रीडा आणि युवक मंडळाचे अध्यक्ष स. गुरमीतसिंघ नवाब, उपाध्यक्ष स. जीतेन्द्रसिंघ खैरा, सचिव स. हरविंदरसिंघ कपूर, स. हरप्रीतसिंघ लांगरी, संदीपसिंघ अखबारवाले, अमरदीपसिंघ महाजन, महेंद्रसिंघ लांगरी यांनी सर्व अतीथींचे सत्कार केले. याप्रसंगी स. गुरमीतसिंघ नवाब यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, नांदेड शहरात श्री गुरु गोबिंदसिंघजी महाराज यांच्या जयंती निम्मित दरवर्षी राष्ट्रीयस्तरावर हॉकी स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. मागील 50 वर्षापासून निरंतरपणे स्पर्धा सुरु असून ही 49 वीं स्पर्धा आहे.
कोविड संक्रमण काळात एक वर्ष स्पर्धा होऊ शकली नव्हती. या वर्षी हॉकी इंडियाच्या निर्देशाने स्पर्धेत राष्ट्रीयपातळीवर खेळणाऱ्या 16 नामवंत संघांनी सहभाग घेतला आहे. सुरुवातीला लीग प्रणालीने स्पर्धा घेतली जाईल नंतर बाद पद्धतीने स्पर्धेचे अंतिम निकाल घेण्यात येईल. प्रथम विजेत्या संघास रोख एक लाखाचे बक्षिस आणि रोलिंग ट्रॉफी प्रदान करण्यात येणार आहे. वरील स्पर्धेसाठी गुरुद्वारा तखत सचखंड बोर्ड नांदेड, गुरुद्वारा श्री लंगर साहेब नांदेड, गुरुद्वारा श्री नानकझीरा साहेब बीदर, नांदेड वाघाला शहर महानगर पालिका आणि दानशूर व्यक्तींचे सहकार्य लाभले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स. जसपालसिंघ काहलो आणि डॉ जुझारसिंघ सिलेदार यांनी केले. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महिंदरसिंघ गाडीवाले, जसबीरसिंघ चीमा, विजय नंदे, महेंद्रसिंघ लांगरी सह सेवाभावी कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभत आहे.