अशोकराव चव्हाण यांच्या आवाहनास प्रतिसाद काँग्रेसकडून 50 नर्सिंग स्टॉफची मोफत सेवा
नांदेड, दि.8 – येथील डॉ.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अचानक वाढलेल्या मृत्यूच्या प्रमाणामध्ये नांदेड देश व राज्यात चर्चेत आले. नवजात बालकांच्या मृत्यूमुळे चिंता व काळजी सर्वत्र पसरली. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी कोणतेही राजकारण न करता परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्वांना मदतीचे आवाहन केले. या आवाहनास प्रतिसाद देत काँग्रेस पक्षाने सलग तिसऱ्यांदा मोफत औषधी दिली आहेत. या सोबतच पक्षाकडून 50 नर्सिंग स्टॉफची रुग्णालयात मोफत सेवा देण्याची तयारी दाखविली. तशी यादी रुग्णालय प्रशासनाकडे सादर केली.
24 तासात 24 मृत्यूची बातमी 2 ऑक्टोबर रोजी वृत्तवाहिन्यांवरुन दाखविण्यात आली. यामध्ये 12 बालकांचा समावेश होता. ही बातमी कळताच तासाभराच्या आत राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी रुग्णालयात धाव घेतली. उद्भवलेली परिस्थिती समाजावून घेतली. परिस्थिती सामान्य करण्यासाठी यामध्ये कोणीही राजकारण करु नये. सर्वांनी सहकार्याची भूमिका घेत उद्भवलेल्या परिस्थितीवर मात केली पाहिजे. या भूमिकेतून रुग्णालय प्रशासनास मदत करण्याचे आश्वासन दिले. औषधीचा तुटवडा लक्षात घेवून काँग्रेस पक्षाने 3 आणि 4 तारखेला सलग दोन दिवस सव्वा पाच लक्ष रुपयांची औषधी दिली.
विविध नेत्यांच्या भेटी दरम्यान नवजात बालकांच्या सुश्रुषा कक्षेत 73 बालके उपचार घेत असून केवळ 3 परिचारिका कामावर आहेत हे लक्षात आले. नर्सिंग स्टॉफचा तुटवडा लक्षात घेवून औषधी सोबतच नर्सिंग स्टॉफची सेवा काँग्रेसकडून उपलब्ध करुन देण्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी संकल्प केला. त्यानुसार आज दि. 7 रोजी काँग्रेस पक्षाच्यावतीने परिचारिकांची यादी व औषधी अधीष्ठाता एस.आर.वाकोडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी माजी पालकमंत्री डी.पी.सावंत, आ.मोहनअण्णा हंबर्डे, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.अंकुश देवसरकर, प्रवक्ते संतोष पांडागळे यांची उपस्थिती होती.