भाजप खासदाराच्या पॅनेलचा धुव्वा मेहुण्याला धूळ चारली!
नांदेड : जिल्ह्यातील सहा कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल रविवारी जाहीर झाला. यात महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. सर्वात धक्कादायक निकाल हा लोहा कृषी उत्पन्न बजार समितीचा लागला आहे. भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा गड असलेल्या लोहा तालुक्यात त्यांना मोठा धक्का बसला आहे. येथे त्यांचे दाजी तथा शेकापचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी बाजी मारत कंधार निवडणुकीचा वचपा घेतला आहे. आमदार श्यामसुंदर शिंदे पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलने १८ पैकी १६ जागेवर विजय मिळवला आहे. दाजी आणि मेहुण्याच्या लढाईत दाजी वरचढ ठरले आहे.
लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागेसाठी शनिवारी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत सर्वाधिक ९८ टक्के मतदान झाले होते. खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि त्यांचे भाऊजी आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्यात ही खरी लढाई होती. दोन्ही नेत्यांकडून पॅनल उतरविण्यात आले होते. बाजार समितीच्या निवडणुकीत दाजी भाऊजींची प्रतिष्ठा पणाला लागली होती.
कंधारप्रमाणेच लोहा बाजार समितीच्या निवडणुकीत खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे वर्चस्व कायम ठेवत त्यांचे भाऊजी श्यामसुंदर शिंदे यांचा पराभव करतील, अशी चर्चा सुरु होती. मात्र लोह्याच्या बाजार समितीच्या निवडणुकीत भाऊजींकडून त्यांना चांगलाच झटका बसला आहे. शेकापचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या नेतृत्वातील शेतकरी विकास पॅनलचे १६ उमेदवार विजयी झाले. तसेच भाजपा पुरस्कृत बळीराजा पॅनलच्या दोन उमेदवारांनी विजय मिळवला आहे.
मिरवणुकीत आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी थोटपले दंड
दरम्यान या विजयानंतर आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या समर्थकाकडून वतीने लोहा शहरात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आमदार शिंदे यांनी दंड थोपटले. मिरवणुकीत हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. ही निवडणूक छोटी असली तरी आगामी निवडणुकीत याचे मोठे पडसाद उमटतील.