शिक्षण
बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती पूर्ववत सुरु करा
परभणी,(मोहम्मद बारी जिल्हाप्रतिनिधी) :
गोर-गरीब कुटूंबातील इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रि मॅट्रीक शिष्यवृत्ती व बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना केंद्र सरकारने पूर्ववत सुरु करावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेस समितीच्या अल्पसंख्यांक विभागाने केली आहे.
केंद्र सरकारद्वारे एसस्सी, एसटी, ओबीसी आणि अल्पसंख्यांक समाजातील गोर-गरीब कुटूंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी व त्यांच्या भविष्याच्या उत्पन्नासाठी पहिली ते आठवीपर्यंत प्रि मॅट्रीक शिष्यवृत्ती व बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना लागू आहे. परंतु, केंद्र सरकारने ही योजना बंद केली. त्यामुळे गोर-गरीब कुटूंबातील हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित रहावे लागणार आहे.
त्यामुळे केंद्र सरकारने या विद्यार्थ्यांचा पूर्णतः विचार करीत ही योजना कार्यान्वित करावी, अशी मागणी जिल्हाध्यक्ष मिनहाज कादरी, जिल्हा प्रवक्ता सुहास पंडीत, जिल्हा उपाध्यक्ष अॅड. मोहम्मद जकीर इकबाल, जिल्हा उपाध्यक्ष सय्यद अगामीया पटेल, खिजर अहेमद खान, पूर्णा शहराध्यक्ष अब्दुल रशीद मामू व परभणी शहराध्यक्ष खदीर खान व सहसचिव शेख मुख्तार यांनी जिल्हा प्रशासनास सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.