राजकारण

बीडमध्ये लोकसभेला भावा बहिणींची लढाई, तुम्ही खासदारकी लढवणार? धनुभाऊंनी सगळंच सांगितलं!

बीड: मागील काही दिवसांपासून राज्यातील सर्वच पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीकरता जोरदार मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे. राजकीय युती, आघाडी केलेल्या पक्षांनी जास्तीत जास्त जागा आपल्याच पक्षाच्या वाट्याला कशा येतील या साठी आखणी करण्यास सुरूवात केली आहे. मागील काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीत लोकसभा निवडणुकीच्या जागांवरून रणकंदन माजले होते. यानंतर शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांच्या २०२४च्या लोकसभा निवडणुकीतील उमदेवारांची कथित यादी प्रसिद्ध झाली होती.

या कथित यादीत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे देखील नाव होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कमीत कमी १२ जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले असून त्यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसने तयारी सुरु केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार ताकद लावण्याचे संकेत दिले आहेत. याचाच भाग म्हणून अजित पवारांचे निकटवर्तीय असलेल्या धनंजय मुंडे यांना बीड लोकसभा मतदार संघातून उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र, धनंजय मुंडे यांनी आज पत्रकार परिषद घेत या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे.

मुंडे म्हणाले की, माझ्यासाठी दिल्ली फार लांब आहे. तसेच आपली महाराष्ट्रातच राहण्याची इच्छा असून मी लोकसभा निवडणूक लढविणार नाही. एखाद्याला अर्धा ग्लास भरलेला दिसतो, कोणाला रिकामा दिसतो. परळीत एका बॅनरवर संसद भवनच्या इमारतीचे चित्र लावल्याने धनंजय मुंडे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरतील या चर्चेला उधाण आले होते. मात्र, आज बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्या चर्चेवर धनंजय मुंडे यांनी अखेर पडदा टाकला आहे.

लोकसभेचा उमेदवार म्हणून पक्षाने माझ्यासोबत अद्याप कसलीही चर्चा केली नाही. माझ्या दृष्टीने दिल्ली खूप दूर आहे. माझी लायकी लोकसभा लढविण्याची नाही. मी आणखी खूप लहान कार्यकर्ता आहे असे सांगत धनंजय मुंडे यांनी तूर्तास तरी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघातून राष्ट्रवादीचाच उमेदवार निवडून येईल असा विश्वास मुंडे यांनी बोलून दाखविला आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button