मेहुण्याचं तेरावं झालं, पण घरी येताना तरुणावरही काळाचा घाला; सलग दोन धक्क्यांनी कुटुंब कोलमडले
जालना : काही दिवसांपूर्वी मेहुण्याचे निधन झाल्यानंतर घरातील जावई म्हणून संपूर्ण कुटुंबाला सावरणाऱ्या तरुणावरच काळाने घाला घातला आहे. मेहुण्याच्या निधनानंतर तेराव्याचा विधी आटोपून घराकडे परतणाऱ्या दिलीप शेनफड बाविस्कर यांचा बस-दुचाकीच्या अपघातात मृत्यू झाला. भोकरदन शहरानजीक आन्वा पाटीजवळ काल बुधवारी सकाळी ही दुर्दैवी घटना घडली. दिलीप शेणफड बावस्कर (वय ३६. रा. देहेड ता. भोकरदन) असं अपघातातील मृताचे नाव आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, दिलीप बावस्कर यांच्या मेहुण्याचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. मयत मेव्हण्याच्या तेराव्याचा विधी मंगळवारी होता. या कार्यक्रमासाठी दिलीप बावस्कर गेले होते. हा विधी आटोपल्यानंतर नातेवाईक,आप्त स्वकिय आपआपल्या घरी रवाना झाल्यानंतर बुधवारी सकाळी दुचाकीवरून दिलीप हे त्यांच्या गावाकडे परतत होते. त्यांची दुचाकी भोकरदन शहराजवळील आन्वा पाटीजवळील एका ट्रॅक्टर शोरूमजवळ आली असताच मलकापूरहून पुण्याकडे निघालेल्या बसने दुचाकीला जोराची धडक दिली.
ही धडक इतकी जोरात होती की अपघातात दिलीप बावस्कर यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले, तर दुचाकीचे पुढील चाक अक्षरशः तुटून बाजूला पडले होते. अपघात होताच आजूबाजूच्या लोकांनी धावपळ करून दिलीप यांना उचलले, पण दिलीप यांचा जागेवरच मृत्यू झालेला होता.
दरम्यान, पोलिसांनी देखील तत्काळ धाव घेत रस्त्यावरील गर्दी बाजूला करत दिलीप यांचे पार्थिव भोकरदन ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवले. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांकडे मृतदेह सोपवण्यात आला. अत्यंत शोकाकुल वातावरणात दहेड येथे दिलीप बावस्कर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुली, एक मुलगा, भाऊ असा मोठा परिवार आहे. १५ दिवसात कुटुंबातील दोन व्यक्तींचे निधन झाल्याने दोन्ही कुटुंबावर शोककळा पसरली असून पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.