कामगाराचा मुलगा कामगार आयुक्त बनला!
नांदेड : आपल्या आई वडिलांच्या कष्टाचं चीज करत जिल्ह्यातील एका कामगाराच्या मुलाने जिद्द आणि मेहनतीच्या बळावर सहायक कामगार आयुक्तपदी मजल मारली आहे. अक्षय भीमराव तुरेराव असं मुलाचं नाव असून तो जिल्ह्यातील कुंडलवाडी हजापूर येथील रहिवासी आहे. २०२१ च्या राज्यसेवेमधून त्याची सहायक कामगार आयुक्तपदी निवड झाली आहे. त्याच्या या यशाने कुटुंबियांना आभाळ ठेंगणं झालं आहे. संपूर्ण तालुक्यातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. विशेष म्हणजे अक्षयचा मोठा भाऊही वस्तू कर विभागात अधिकारी आहे
जिल्ह्यातील कुंडलवाडी शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर हज्जापूर हे छोटसं गाव आहे. अक्षयचे वडील भीमराव तुरेराव हे मोलमजुरी करतात तर आई अंगणवाडी सेविका आहे. भीमराव तुरेराव यांना अजय आणि अक्षय असे दोन मुले आहेत. घरची परिस्थिती हालाखीची असताना देखील त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना चांगले शिक्षण दिले. शिक्षणासाठी कुठली गोष्ट कमी पडू दिली नाही.
अक्षयने पहिली ते बारावीपर्यंतचं शिक्षण कुंडलवाडी आणि धर्माबाद शहरात पूर्ण केलं. त्यानंतर कोल्हापुरातून बी.टेकची पदवी प्राप्त केली. आयुष्यात मोठा शासकीय अधिकारी बनण्याचं अक्षयचं स्वप्न होतं. आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली. २०१८ मध्ये त्याने एमपीएससीची परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात तो नायब तहसीलदार बनला. तीन वर्ष वर्धा येथे नायब तहसीलदारपदी तो कार्यरत आहे.
सेवेत असताना देखील अक्षयने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरूच ठेवली होती. २०२१ मध्ये त्याने पुन्हा एमपीएससीची परीक्षा दिली. त्यात देखील यश मिळवत त्याची सहायक कामगार आयुक्तपदी निवड झाली. आपल्या आई वडिलांच्या कष्टाचं चीज करत त्याने हे यश संपादन केलं आहे.
मोठ्या भावाची मिळाली प्रेरणा
अक्षयला आपल्या आई वडिलांसोबतच त्याच्या मोठ्या भावाची देखील तेवढीच साथ मिळाली. अक्षयचा मोठा भाऊ अजय हा वस्तू कर विभागात अधिकारी आहे. आपल्या भावाचा प्रेरणादायी प्रवास आणि आई वडिलांचं कष्ट डोळ्यासमोर ठेवून त्याने स्पर्धा परीक्षेची सुरु केली होती. अजयने वेळोवेळी मार्गदर्शन देखील केलं. रात्रंदिवस अभ्यास करत यशोशिखर गाठलं आहे.