कॅशिअर बँकेत गेला तो परतलाच नाही, फोनही बंद; लाखो रुपयांसह गायब, मॅनेजर थेट पोलीस ठाण्यात
जालना :बँकेत पैसे भरण्यासाठी गेलेल्या कॅशिअरनेच अकरा लाख रुपये घेऊन पोबारा केल्याची घटना भोकरदन तालुक्यात घडली आहे. भोकरदनच्या भारत फायनान्स शाखेचा कॅशियर महिला बचतगटाची रक्कम बॅंकेत जमा करण्यासाठी गेला अन् परतलाच नाही. यानंतर शाखा व्यवस्थापकाने अनेक फोन केले. मात्र,त्याने फोन उचलला नाहीत. भोकरदन येथील भारत फायनान्स शाखेच्या व्यवस्थापकाने पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. सुधाकर यादव अपुलवार (रा. बितमाळ ता. उमरी, जि .नांदेड) असे संशयिताचे नाव आहे. कृष्णा वसंत जाधव (वय ३० वर्षे, व्यवसाय खासगी नौकरी, ब्रँच मॅनेजर, भारत फायनायन्स, रा. लक्ष्मीनगर भोकरदन, ता. भोकरदन, जि. जालना) यांनी या प्रकरणी पोलिसांना प्राथमिक माहिती दिली.
कृष्णा वसंत जाधव हे भोकरदन येथील भारत फायनायन्समध्ये ब्रँच मँनेजर या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या सोबत सुधाकर यादव अपुलवार हा कॅशिअर म्हणून काम करतो तसेच अन्य सहकारीही या शाखेत काम करतात. शाखा व्यवस्थापक कृष्णा जाधव यांनी पोलिसांना माहिती दिली की, बुधवारी (दि.१७) सकाळी ७ वाजता नेहमीप्रमाणे ते त्यांच्या कार्यालयाच्या ठिकाणी भारत फायनान्स भोकरदन येथे आले. सकाळी आठच्या सुमारास शाखेतील अन्य सहकारी हे वेगवेगळ्या खेडेगावात बचतगटाचे हप्ते वसूल करण्यासाठी निघून गेले होते. भोकरदनच्या भारत फायनायन्सकडे दररोज महिला बचतगटाचे पैसे जमा होतात त्यानुसार बुधवारी (दि.१७) रोजी भारत फायनायन्समध्ये काही ठेव व वाटप करण्याची रक्कम जमा होती.
सकाळी कामसाठी बाहेर जाताना शाखा व्यवस्थापक कृष्णा जाधव यांनी सोबत काम करणाऱ्या सुधाकर यादव अपुलवार (रा. बितमाळ ता. उमरी, जि. नांदेड) याला बचत गटाची जमा असलेली रक्कम बँकेत जमा करून येण्यास सांगितलं होतं. बचत ठेवीचे पैसे जमा करण्यासाठी नेहमी सुधाकर बँकेत जात असे. त्यामुळे शाखा व्यवस्थापक कृष्णा जाधव यांनी जमा असलेले ११ लाख ५१ हजार ५६० रुपये सुधाकरकडे दिले आणि कर्जासाठी कोणी सभासद आल्यास त्यांना कर्जाचे वाटप करा आणि शिल्लक पैसे बँकेत जामा करा, असे सुधाकर यांना सांगितले. यानंततर शाखा व्यवस्थापक कृष्णा जाधव हे वसुलीसाठी वालसावंगी येथे निघून गेले होते. मात्र, कॅशिअर अपुलवार यानं पैसे बँकेत जमा न करता तो गायब झाला आहे.
याप्रकरणी कृष्णा जाधव यांच्या फिर्यादीवरून भोकरदन पोलीस ठाण्यात संशयित सुधाकर अपुलकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास भोकरदन पोलीस करीत आहेत.