बांधकामाची परवानगी देतो, अडीच लाख द्या, मुख्याधिकाऱ्याने लाच मागितली अन् फसला….
सांगली : विटा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यास लाच घेताना ताब्यात घेण्यात आले आहे. विनायक औंधकर असं या मुख्याधिकाऱ्याचं नाव आहे. नगरपालिकेच्या कार्यालयातच दोन लाख रुपयांची लाच घेताना सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून विनायक औंधकर यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
विटा नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन लाखांची लाच घेताना रंगेहात पकडलं. मुख्याधिकारी असणारे विनायक औंधकर यांनी विटा शहरातल्या एका ठेकेदाराकडे बांधकामाच्या इमारतीसाठी परवानगी देण्याकरिता अडीच लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर दोन लाखांवर ही तडजोड झाली होती.
त्यानंतर संबंधित ठेकेदाराने सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबतची तक्रार दाखल केली होती. याची पडताळणी करून प्रतिबंधक विभागाकडून विटा नगरपालिका कार्यालयामध्ये सापळा रचून तक्रारदाराकडून दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना औंधकर यांना रंगेहात पकडलं. त्यानंतर औंधकर यांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी करत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरा पर्यंत सुरू होती.
तीन महिन्यांपूर्वी विनायक औंधकर यांची विटानगर पालिकेच्या मुख्याधिकारीपदी नियुक्ती झाली होती. या आधी ते सातारा जिल्ह्यातल्या कराड नगरपालिकेमध्ये मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होते. विटा नगरपालिकेमध्ये नियुक्ती झाल्यानंतर त्यांची कारकीर्द सुरू होण्यापूर्वी वादग्रस्त ठरली. घटनेमुळे विटा नगरपालिकेसह जिल्हा प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे.