विमानतळ उडवण्याची धमकी; कारण ऐकूण पोलिसांनीही लावला डोक्याला हात
छत्रपती संभाजीनगर, : छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बायकोशी भांडण झालं म्हणून एका व्यक्तीनं चक्क विमानतळ उडवण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. नियंत्रण कक्षाला आलेल्या फोनमुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. अखेर फोन करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मांगीर बाबाच्या जत्रेला जात असताना गाडीतील चार व्यक्ती उद्या आणि परवा विमानतळावर बॉम्बस्फोट करणार असल्याची चर्चा करत होते, अशी माहिती या व्यक्तीनं नियंत्रण कक्षाला फोन करून दिली होती. यामुळे काही काळ पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली.
नेमकं काय घडलं?
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मांगीर बाबाच्या जत्रेला जात असताना गाडीतील चार व्यक्ती उद्या आणि परवा विमानतळावर बॉम्बस्फोट करणार असल्याची चर्चा करत होते. अशी माहिती एका व्यक्तीनं फोन करून पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दिली. यामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. एमआयडीसी सिडको पोलिसांसह, बीडीडीएस, एटीएसच्या पथकाने विमानतळावर धाव घेतली, मात्र त्या ठिकाणी तपासणी केल्यानंतर काहीच नसल्याचे स्पष्ट झाले.
…म्हणून पोलिसांना केला कॉल
दरम्यान त्यानंतर पोलिसांनी फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतलं. चौकशीमध्ये त्यानं धक्कादायक खुलासा केला आहे. बायकोसोबत भांडण झाल्यामुळे आपण असा कॉल पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला केल्याचं त्याने म्हटलं आहे.