माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण व पालकमंत्री गिरीष महाजन यांचा पाठपुरावा इजळी-मुगट अपघातातील मृतांच्या परिवारास 5 लाखाची मदत
नांदेड – मुदखेड तारलुक्यातील इजळी-मुगट रस्त्यावर ट्रक व रिक्षाच्या झालेल्या भीषण अपघातात गेल्या आठवड्यात पाच जण जागीच ठार झाले होते. तर आठ प्रवाशी जखमी झाले होते. प्रवास करणाऱ्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती पहाता यांच्या कुंटुंबियांना मुख्यमंत्री साह्यत्ता निधीतून आर्थिक मदत करावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण व जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. याची तात्काळ दखल घेत शासनाने मृत व्यक्तीच्या परिवारास 5 लक्ष रुपयांची मदत देण्याचे जाहिर केले आहे.
दि. 30 मार्च रोजी सकाळी 10 च्या सुमारास मुदखेड तालुक्यातील मुगट ते इजळी रस्त्यावर मुदखेडकडे जाणाऱ्या सिमेंट वाहतुक ट्रक व ॲटोरिक्षाची धडक झाली. ॲटोरिक्षातील 13 प्रवाशांपैकी 5 प्रवाशी जागीच ठार झाले. तर इतर 8 प्रवाशी या अपघातात गंभीर जखमी झाले. या ॲटोत प्रवास करणाऱ्या मयतांमध्ये गेवराई येथील गालीअम्मा कल्याण भोई व वैजल कल्याण भोई, भोकर तालूक्यातील माळसावरगाव येथील पुंडलीक बळीराम कोल्हाटकर, मुदखेड तालुक्यातील इजळी येथील विद्या संदेश हाटकर तर पवनसूतनगर मेहकर येथील ज्योती रमेश भोई यांचा समावेश होता.
मृत पावलेल्या व जखमी झालेल्या सर्वच व्यक्ती गरीब कुंटुंबातील आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता मुख्यमंत्री साह्यता निधीतून भरीव मदत करावी अशी विनंती माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण व पालकमंत्री गिरीष महाजन यांनी 2 एप्रिल 2023 रोजी पत्र पाठवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. यासंदर्भाचा जायमोक्यावरील पंचनामा व जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल या सर्व बाबी लक्षात घेवून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण व पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केलेल्या मागणीची तात्काळ दखल घेत मुख्यमंत्री साह्यता निधीतून मृत व्यक्तींच्या परिवारास 5 लक्ष रुपयांचा निधी देण्याचे आज मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून जाहिर करण्यात आले. तर जखमींवर रुग्णालयात योग्य ते उपचार करण्यात यावा अशा सूचना देण्यात आल्या.