मुदखेड तालुक्यात भाजपाला खिंडार उद्योग आघाडीचे सचिव गांधी पवार यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश
नांदेड दि. ३ मुदखेड तालुक्यातील भाजपाचे नेते तथा उद्योग आघाडीचे सचिव गांधी पवार आमदुरेकर यांनी सोमवार दि. ३ एप्रिल रोजी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
जिल्ह्यात होत असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुक पार्श्वभूमिवर पुन्हा एकदा भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजप उद्योग आघाडीचे सचिव गांधी पवार आमदुरेकर, पाथरडचे चेअरमन गंगाराम पाटील व साईनाथ पवार यांनीही सोमवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
नांदेड व भोकरसह जिल्ह्यातील पाच कृषी उत्पन्न बाजार समितींच्या निवडणुकीची धाम धूम सुरु आहे. या पार्श्वभूमिवर यापूर्वीच भाजपाचे भोकर तालुका सरचिटणीस राजकुमार अंगरवाड, सरपंच संघटनेचे तालुका उपाध्यक्ष मारोतराव अंगरवाड या दोघा बंधूंसह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपाला राम-राम करत काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याची घटना ताजी असतांना पुन्हा त्यात भर पडत गांधी पवार आमदुरेकर, पाथरडचे चेअरमन गंगाराम पाटील व साईनाथ पवार यांनी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
या दोन्ही पक्ष प्रवेश सोहळ्यांमुळे नांदेड व भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीं निवडणुकीत भाजपाला धक्का तर काँग्रेसची बाजू अधिक मजबूत झाल्याचे चित्र आहे. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या आजच्या पक्ष प्रवेश सोहळ्यास माजी मंत्री डी.पी.सावंत ,भाऊराव चव्हाण साखर कारखाण्याचे चेअरमन गणपतराव तिडके,बारडचे उपसरपंच बाळासाहेब देशमुख बारडकर आदींची उपस्थिती होती.