रेती माफिया कडे दुर्लक्ष करणाऱ्या जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी
नांदेड दि.३ नांदेड जिल्ह्याला गोदावरी ही पवित्र नदी लाभल्यामुळे जिल्ह्याच्या वैभवात भर पडलेली आहे. पण या गोदावरी नदी मध्ये मोठ्या प्रमाणात रेतीमाफी यांनी हैदोस घातला आहे. अनेक ठिकाणी हे रेती माफिया अवैद्य रेती काढून चढ्या भावामध्ये ती विकत आहेत.अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी या विरोधात वेळोवेळी जिल्हाधिकारी, तहसीलदार व संबंधितांना निवेदनेही दिली आहेत, पण संबंधित अधिकारी हे याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करताना दिसून येतात.
मागील आठवड्यात गोदावरी काठी झालेल्या मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमा वेळी सामाजिक कार्यकर्ते दिलीप सिंघ सोडी यांनी नांदेडचे तहसीलदार यांना स्टेजच्या मागच्या बाजूला चालू असलेली अवैद्य रेती वाहतूक प्रत्यक्ष नेऊन दाखविली व आपण यावर कारवाही का करत नाहीत असा जाब देखील विचारला. तहसीलदार साहेबांनी यावेळी वेळ मारून नेण्यापुरते बोलून त्याकडे दुर्लक्ष केले.
या संदर्भात दिलीपसिंघ सोडी यांनी विभागीय आयुक्त यांच्याकडे जिल्हाधिकारी नांदेड व तहसीलदार नांदेड यांच्या विरोधात तक्रार दाखल करून व योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. संबंधित तक्रारीच्या प्रतीलीपी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना देखील पाठवण्यात आल्या आहेत. विभागीय आयुक्त यावर कोणती कारवाई करतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.