कर्नाटकात होणार भाजपचा दारुण पराभव; पहिल्याच ओपिनियन पोलचा अंदाज
कर्नाटक विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा होताच या निवडणुकीबाबत अंदाज वर्तवणारे ओपिनियन पोल्स समोर येऊ लागले आहेत. एबीपी न्यूज आणि सी वोटर तसेच लोकपोलच्या ओपिनियन पोलमध्ये कर्नाटकात भाजपचा दारुण पराभव होईल, तर काँग्रेस सर्वाधिक जागा मिळवून सत्तेत येईल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
कर्नाटकात 2008 पासून कोणालाही बहुमत मिळालेले नाही. 2018 साली विधानसभेचा निकाल त्रिशंकू होता. यावेळच्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांत खरी चुरस आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी भाजप पुन्हा बहुमताने सरकार स्थापन करेल असा दावा केला आहे, तर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनीही कॉँग्रेसच्या विजयासाठी कंबर कसली आहे. जेडीएसनेदेखील दावेदारी ठोकली आहे. त्यात निवडणूक जाहीर होताच पहिल्याच जाहीर करण्यात आलेल्या ओपिनियन पोलमध्ये कर्नाटकात भाजपचा पराभव होईल असे भाकित वर्तवण्यात आले आहे.
कुणाचा काय अंदाज…
एबीपी न्यूज आणि सी वोटरच्या ओपिनियन पोलनुसार कर्नाटकमध्ये काँग्रेस मोठी मुसंडी मारेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. विधानसभेच्या एकूण 224 जागांपैकी काँग्रेसला 115 ते 127 जागा मिळतील, तर भाजपला 68 ते 80 आणि जनता दल सेक्युलर पक्षाला 23 ते 35 जागा आणि इतरांना 2 जागा मिळतील, असे या ओपिनियन पोलमध्ये म्हटले आहे.
लोक पोलच्या ओपिनियन पोलनुसार कर्नाटकमध्ये यावेळी सत्तांतर होणार आहे. या पोलनुसार राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन होईल. काँग्रेसला राज्यात 116 ते 123 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर भाजपला 77 ते 83 जागा मिळतील. जेडीएस 21 ते 27 दरम्यान असेल. अन्यच्या खात्यात 1 ते 4 जागा असतील. लोक पोलच्या दाव्यानुसार या सर्व्हेत 45 हजार लोकांचे मत विचारात घेतले गेले आहे.
पॉप्युलर पोल्सच्या सर्व्हेनुसार राज्यात यावेळी कोणालाही बहुमत मिळणार नाही. या सर्व्हेनुसार भाजप आणि काँग्रेस यांच्यात चुरस असेल. भाजपला 82 ते 87 तर काँग्रेसलादेखील 82 ते 87 जागांवर विजय मिळेल. 2018 साली काँग्रेसच्या मदतीने सरकार स्थापन करणाऱ्या एचडी कुमारस्वामी यांच्या जेडीएस पक्षाला 42 ते 45 जागा मिळू शकतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.