आदिलाबाद मुदखेड रेल्वे लाईनसह हिमायतनगर रेल्वे स्थानकावर प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून द्या – गौतमचंद यांची मागणी
हिमायतनगर। शहर हे तेलंगाना विदर्भाच्या बॉर्डरवर आहे. या ठिकाणी रेल्वे स्थानक असून मीटर गेजचे ब्रॉडगेज मध्ये रूपांतर झाल्यानंतर म्हणाव्या तशा सुविधा अद्यापही उपलब्ध झाल्या नाहीत. ही बाब लक्षात घेता तत्काळ आदीलाबाद मुदखेड रेल्वे लाईनवर येणाऱ्या सर्व प्रवाश्यांना आवश्यक असलेल्या सर्व सुविधा हिमायतनगर स्थानकावर उपलब्ध करून द्याव्यात. अशी मागणी रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष गौतमचंद पिंचा यांनी एका निवादिनाद्वारे विभागीय रेल्वे व्यवस्थापक नांदेड यांच्याकडे केली आहे.
मागील अनेक वर्षापासून रेल्वे स्थानकावर महिला प्रवाश्यांना आवश्यक असलेल्या विविध सुविधांची मागणी केली जात आहे. मात्र याकडे रेल्वे प्रशासनाकडून वारंवार दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे पावसाळ्यात प्रवाशांना पाण्यात भिजत तर उन्हाळ्यात उन्हाचे चटके सहन करत रेल्वेचा प्रवास करावा लागतो आहे. कारण हिमायतनगर रेल्वे स्टेशन आणि या रस्त्यावर असलेल्या बहुतांश रेल्वे स्थानकावर प्रवाशांना बसण्यासाठी आसन व्यवस्था, शेड आणि शौचालय तसेच सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस चौकी उपलब्ध नाही. याचबरोबर हिमायतनगर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची संख्या 400 ते 500 असताना देखील या ठिकाणी एटीव्हीएम. मशीन लावण्यात आली नाही. एव्हढेच नाहीतर उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते आहे. या प्रमुख सुविधा येथे होणे आवश्यक आहे.
तसेच रेल्वे क्रमांक 17618 तपोवन एक्सप्रेस आदिलाबाद पर्यंत विस्तारीत करावी, ट्रेन क्रमांक 17617 नांदेड मुंबई आदिलाबाद पर्यंत सोडण्यात यावी रेल्वे क्रमांक 07775 ही आदिलाबाद परळी रेल्वे गाडीला वाढलेली गर्दी लक्षात घेता एक कोच वाढविण्यात यावे. तसेच गाडी नंबर 07852 या परळी आदिलाबाद गाडीला प्रवाशांची गर्दी होत असून, या गाडीसाठी डबा वाढविणे गरजेचे आहे. ट्रेन नंबर 16594 नांदेड यशवंतपुर ही गाडी आदीलाबादहून सोडण्यात यावी तसेच ट्रेन नंबर 16593 यशवंतपुर नांदेड ही गाडी आदीलाबाद पर्यंत विस्तार करावी. ट्रेन नंबर 17623 नांदेड गंगासागर एक्सप्रेस आदिलाबाद पासून सोडण्यात यावी, ट्रेन नंबर 17624 गंगासागर नांदेड एक्सप्रेस आदिलाबाद पर्यंत वाढवावी. ट्रेन नंबर 11045 11046 दीक्षाभूमी एक्सप्रेस गाडीला हिमायतनगर येथील रेल्वे स्थानकावर थांबा द्यावा. अशा विविध मागण्याचे निवेदन विभागीय व्यवस्थापक नांदेड यांना गौतमचंद पिंचा यांनी दिलं आहे.