राजकारण
श्रीजया चव्हाण येणाऱ्या काळात अशोक चव्हाण यांचा राजकीय वारसा चालविणार काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांचा विश्वास
नांदेड, दि. 6 ः डॉ.शंकरराव चव्हाण यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात नांदेडच्या तत्कालिन नगरपालिकेपासून करत राज्य व देशातील अनेक महत्वाची पदे भुषविली. स्वच्छ चारित्र्याचा नेता म्हणून देशात नाव कमविले. त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवत अशोकराव चव्हाण यांनी राज्यात अनेक वर्ष मंत्रीपद भुषवितांनाच दोन वेळेस राज्याच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. आता श्रीजया चव्हाण यांनी राजकारणात यावे अशी या भागातील जनतेची मागणी आहे. या मागणीचा विचार करत अशोकराव चव्हाण यांचा राजकीय वारसा श्रीजया चव्हाण या चालवितील असा विश्वास काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांनी व्यक्त केला.
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या माध्यमातून भोकर विधानसभा मतदारसंघात कोट्यावधी रुपयांची विकासकामे सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर भोकर व मुदखेड तालुक्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे जाहीर आभार व्यक्त करण्यासाठी भोकर तालुक्यातील सोनारी व मुदखेड तालुक्यातील रोहिपिंपळगाव येथे भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. त्यावेळी अमरनाथ राजूरकर बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, चव्हाण कुटुंबियातून आधी डॉ.शंकरराव आता अशोकराव व येणाऱ्या काळात श्रीजया राजकारणात सक्रिय होणार आहेत. त्यांच्या राजकारणातील प्रवेशाची या भागातील जनतेला मोठी प्रतीक्षा आहे. मागील काही वर्षांपासून निवडणूकीचा आराखडा ठरवून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी पडद्याच्या पाठीमागे राहून मोठी भूमिका वटविली आहे. आता या भागातील जनतेची मागणी व चव्हाण कुटूंबाचा राजकीय वारसा चालविण्याची गरज लक्षात घेवून श्रीजया चव्हाण या सक्रिय राजकारणात लवकरच येतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
डॉ.शंकरराव चव्हाण यांनी बांधलेल्या अनेक धरणांमुळे नांदेड जिल्ह्याचा परिसर सुजलाम् सुफलाम् झाला आहे. उन्हाळ्यात सुद्धा या भागात असलेली हिरवळ पाहून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीसुद्धा या कामाचे नांदेड दौऱ्यात मोठ्या मनाने कौतूक केले होते. या हिरवळीच्या पाठीमागे डॉ.शंकरराव चव्हाण यांची कल्पक दृष्टी असल्याचेही यावेळी अमरनाथ राजूरकर यांनी सांगीतले.