स्त्री ही कुठलेही काम करताना अनामिक भीतीच्या छायेखाली असते – वर्षा ठाकूर-घुगे
नांदेड,1- महिलांचा जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास संघर्षाचा असतो. स्त्री ही कुठलेही काम करताना अनामिक भीतीच्या छायेखाली असते. प्रत्येक उंबरठ्यावरची भीती घालवा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज केले. नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने आजपासून दिनांक 1 ते 8 मार्च दरम्यान महिला सन्मान सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. आज कार्यक्रमाचा पहिल्या दिवशी आरोग्य विभागाच्या जिल्हा ते गावस्तरावरील सर्व महिला कर्मचाऱ्यांचा मेळावा येथील ए. के. संभाजी मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला, त्यावेळी बोलत होत्या.
यावेळी मराठी सिने अभिनेत्री स्मिता शेवाळे, विक्रांत उरणकर, आहार तज्ञ डॉ. वैदेही नवाथे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संतोष तुबाकले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्ना, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, रेखा कदम, शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, कृषी विकास अधिकारी भाग्यश्री भोसले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भूपेंद्र बोधनकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, डॉ. निना बोराटे, डॉ. संतोष चौधरी, डॉ. शिवशक्ती पवार आदींची उपस्थिती होती.
पुढे त्या म्हणाल्या, ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्यमान उंचावण्यासाठी आरोग्य विभागातल्या कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे. आशा वर्कर्स, एएनएम, आरोग्य सेविका, तालुका आरोग्य अधिकारी, अधिकारी यांनी करोना काळातील सेवावृत्ती
वाखाजण्याजोगी आहे. पांढरा युनिफॉर्म हे आरोग्य सेवेचे प्रतीक आहे. हा सेवावृत्तीचा वसा आपण कायम पुढे ठेवावा असे आवाहन केले.
प्रारंभी धन्वंत्रीची पूजा करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी उपास्थितांचा बुके व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. आरोग्य विभागाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांचा पैठणी, नथ व गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात आला. आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या महिला अधिकारी व कर्मचारी यांचा यावेळी स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊनत्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी आहार तज्ञ डॉ. वैदेही नवाथे, विक्रांत उरणकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष देवराई यांनी केले.
सिने अभिनेत्री स्मिता शेवाळे यांनी उपस्थिताशी उत्तम संवाद साधला. त्यांच्या भावविश्वाशी एकरूप होऊन प्रत्येक स्त्रीला करावा लागणारा संघर्ष हा सारखाच असतो हे सांगताना त्यांनी त्यांचे जीवनानुभव सांगितले. कोणतेही काम करताना शरीर स्वास्थ्यासह मनाचे स्वास्थ्य उत्तम राहणे आवश्यक आहे. यासाठीच्या काही टिप्स त्यांनी सांगितल्या. त्यांचे सिनेमे आणि मालिकांमधील प्रसंग साक्षात केले. उपस्थिताशी अत्यंत उत्स्फूर्तपणे काही जणांनी संवाद केला.
आज सरपंच मेळावा
आज गुरुवार दिनांक 2 मार्च रोजी जिल्ह्यातील महिला सरपंच मेळावा घेण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी 10 वाजता होणाऱ्या कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमात आहार तज्ञ डॉ. वर्षा डोडगे, नायब तहसीलदार संजीवनी मुपडे यांचे शेती, गायरान रस्ते व जमिनी विषयक कायदे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील प्रा. सत्यभामा जाधव यांचे लिंग समभाव, अँड. मीनाकुमारी बतुला यांचे महिला विषयक कायदे, पोस्ट असिस्टंट किरण डांगे यांचे पोस्टाच्या महिलांसाठी विविध योजना, महिला व आरोग्य या विषयावर डॉ. वृषाली किन्हाळकर तसेच मुंबई अधिनियम कायदे या संदर्भात विस्तार अधिकारी प्रदीप सोनटक्के मार्गदर्शन करणार आहेत. तर उद्या 3 मार्च रोजी कृषी विभागाच्या वतीने कृषी विभागातील विविध योजनांचा लाभ घेतलेल्या महिलांचा मेळावा जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी 11 वाजता होईल. शेतीतज्ञ माधुरी येवनवार यांचे किचन गार्डन आणि शेती व्यवसाय याविषयार व्याख्यान आयोजित केले आहे. याप्रसंगी शेतकरी महिलांचे आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. तसेच शेतकरी महिलांना सनकोट, स्कार्प व वृक्षांचे वाटप करण्यात येणार आहे.