मराठवाडा
सिव्हिल’वर मेडिकल कॉलेजचा बोर्ड झळकला….
परभणी: परभणी जिल्हा प्रतिनिधी
येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर बुधवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पिटल असा नामोल्लेख असणारा बोर्ड झळकला….
येथील जिल्हा शासकीय रुग्णालयास तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा दर्जा बहाल केला. औरंगाबाद येथील मराठवाडा मुक्ती दिनाच्या मुख्य ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात श्री.ठाकरे यांनी यासंबंधीची अधिकृत घोषणा केली. हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परभणीत स्थापन व्हावे यासाठी शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी सर्व क्षेत्रातील मंडळींसह दोन वेळा मोठे जनआंदोलन उभारले,या आंदोलनाने संपूर्ण जिल्हा ढवळून निघाला होता. आंदोलनात सर्वपक्षीय नेते मंडळी सहभागी होती.
खासदार श्रीमती फौजिया खान माजी आमदार अँड विजय गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली परभणीकर संघर्ष समितीने या महाविद्यालयाकरिता शासकीय पातळीवर भक्कम असा पाठपुरावा सुरू केला होता. जिल्ह्यातील सत्तारूढ व विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी विधानसभा व विधान परिषदेत या अनुषंगाने वारंवार प्रश्न उपस्थित केला, या पार्श्वभूमीवर पुढील शैक्षणिक वर्षापासून हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परभणीत कार्यान्वित होईल असे चित्र स्पष्ट झाल्यानंतर परभणीकरांना मोठा दिलासा मिळाला. दरम्यान बुधवारी दुपारी रुग्णालय प्रशासनाने बाह्य रुग्ण विभागाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील प्रवेशद्वारावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा बोर्ड झळकावून परभणीकरांना सुखद धक्का दिला आहे.