‘नेसुबोस’ महाविद्यालयात ज्येष्ठांचा सत्कार समारंभ संपन्न….
दि. 23 जानेवारी – नांदेड येथील अभिनव भारत शिक्षण संस्था संचलित, नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात नेताजी जयंती, भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि अभिनव भारत शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवा निमिताने दिनांक 23 जानेवारी रोजी वयाची 75 वर्ष पुर्ण केलेल्या ज्येष्ठांच्या सत्काराचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. बालासाहेब पांडे, अध्यक्ष अभिनव भारत शिक्षण संस्था हे होते. या भव्यदिव्य अशा ज्येष्ठांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमा करिता नांदेड शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक देखील उपस्थित होते, कार्यक्रमाची सुरुवात ही दीपप्रज्वलनाने व वेदपठणांनी करण्यात आली. या प्रसंगी महाविद्यालयातील प्रा. अशोक ठावरे यांनी गायलेल्या स्वागत गिताने उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी मंचावर उपस्थित मान्यवरांमध्ये माजी शिक्षण मंत्री श्री कमल किशोर कदम व सौ. लता कदम तसेच मा. खासदार व्यंकटेश काब्दे व सौ. कुंजम्मा काब्दे, महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री माधवरावजी किन्हाळकर तसेच संस्थेचे पदाधिकारी व सदस्य डॉ. सविता भालेराव, श्री कैलाशचंद काला, श्री गजाननराव कुलकर्णी, ॲड. वनिता जोशी, श्री माधवराव पांडे सौ. अनीता बावने हे उपस्थित होते. या जेष्ठांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमाकरिता नांदेड जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणीक, राजकीय, आर्थिक, वैद्यकीय व समाजसेवा क्षेत्रातील 100 जेष्ठ नागरिक उपस्थित होते, कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी वार्षिक महोत्सव समितीच्या प्रमुख प्रा. शालिनी वाकोडकर यांनी केले. “ज्येष्ठांचा सन्मान हा भावी पिढीतील युवकांच्या मार्गदर्शनासाठी अनुभवाची शिदोरी म्हणून कधीच दुर्लक्षित करता न येऊ शकणारी बाब आहे.” असे मत सौ. वाकोडकर यांनी मांडले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर शिवणीकर मागील पन्नास वर्षाचा महाविद्यालयाचा शैक्षणिक, भौतीक, सामाजीक प्रगतीचा अहवाल मांडला.
महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी ॲड. उदय संगारेड्डीकर, यांचा राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला, तसेच प्रा. डॉ. मनोज बोरगावकर यांच्या नदिष्ट् या कादंबरीला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. शासकीय छायाचित्रकार मा. श्री. विजय होकर्णे यांचा छायाचित्रातील क्षेत्रामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल व महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.उषा सूर्यवंशी हिने नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात सहभाग नोंदविल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य प्रा. डाॅ. दीपक कासराळीकर यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यामध्ये उपस्थित असलेल्या सर्व ज्येष्ठांचा सपत्नी / सहपति सत्कार हा अभिनव भारत शिक्षण संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला. ज्येष्ठांचा चा सत्कार या कार्यक्रमाचे अभूतपूर्व असे नियोजन भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. मनिष देशपांडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती निमीत्त बोलत असताना माजी राज्यमंत्री मा. डाॅ. माधवराव किन्हाळकर यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवन संघर्षावर विचार मांडले “नेताजी चे संपूर्ण आयुष्य म्हणजेच एक प्रचंड व प्रभावशाली अशा देशभक्तीचे मूर्तिमंत उदाहरण आहे. नेताजींनी आपले संपूर्ण आयुष्य हे अतिशय संघर्षपूर्ण व प्रतिकूल परिस्थितीतून जगत असताना या देशातील लोकशाही शासन व्यवस्था अधिकाधिक कशी प्रभावी करता येईल यासाठी प्रयत्न केला होता, नेताजींच्या संघर्षपूर्ण आयुष्याचा विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा असे मत यावेळी त्यांनी मांडले”.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. अजय संगेवार , पर्यवेक्षिका सौ. डॉ. अर्चना भवानकर, प्रा. कमलाकर बाऱ्हाळीकर विवीध समित्यांचे प्रमुख व सदस्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंग्रजी विभागातील प्रा. डाॅ. संदीप काळे व डाँ. दिपक कासराळीकर यांनी केले आभार मराठी विभागात कार्यरत प्रा. दत्ता बडुरे यांनी मांडले. या कार्यक्रमाची सांगता प्रा. अशोक ठावरे यांनी गायलेल्या वंदे मातरम् या गीतांने करण्यांत आली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.