जागतिक हात धुवा दिवस: नांदेड जिल्हयात विविध उपक्रम
मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांची माहिती
नांदेड,11- 15 ऑक्टोबर हा दिवस जागतिक हात धुवा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत जिल्हयात विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत, अशी माहिती नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करनवाल यांनी दिली आहे.
जागतिक स्वच्छता दिनाच्या संकल्पनेला धरून अन्न स्वच्छता, हात धुण्याच्या महत्त्वाच्या वेळा यासंदर्भात लोकशिक्षण घडून आणण्यासाठी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी ग्राम पंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, शाळा, महाविद्याल व अंगणवाडयामधून जागतिक हात धुवा दिवस साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त शालेय विद्यार्थी व गावक-यांना हात धुण्याच्या पद्धती, हात धुण्याचे फायदे, स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध विभागांना समन्वय साधून काम करावे. यामध्ये ग्रामपंचायत विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, महिला व बालविकास विभाग यांनी कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन करावे, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दिले आहेत. तसेच लोकप्रतिनिधी, महिला बचत गट, युवक-युवती, महिला मंडळ, शालेय विद्यार्थी तसेच गावक-यांनी जागतिक हात धुवा दिवसानिमित्त होणा-या कार्यक्रमात मोठया संख्येने उपस्थित राहून हा दिवस साजरा करावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल व उप मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ यांनी केले आहे.
स्वच्छता ही केवळ वैयक्तिकच नव्हे तर सार्वजनिक आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. या मोहिमेत एकत्र सहभागी होऊन हात धुण्याचे महत्व जाणून घ्यावे. तसचे आपला परिसर स्वच्छ ठेवावा. – उप मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ