विद्यार्थी हे देशाचे भविष्य: सर्व क्षेत्रात पुढे राहावे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल
येरगी येथे बालीका पंचायत राज उपक्रमासह विविध कार्यक्रम
नांदेड,११- विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. त्या अनुषंगाने, त्यांनी सर्व क्षेत्रात पुढे राहिले पाहिजे. यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणात उत्कृष्टता साधण्याची आणि विविध क्षेत्रात अग्रगण्य होण्याची प्रेरणा द्यावी, असे प्रतिपादन नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी कले.
देगलूर तालुक्यातील येरगी येथे आज गुरुवार दिनांक ११ जुलै रोजी बालीका पंचायत व ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी तहसीलदार राजाभाऊ देशमुख, गट विकास अधिकारी शेखर देशमुख, नायब तहसीलदार नागमवाड, तालुका आरोग्य अधिकारी रमेश गवाले, बाल विकास प्रकल्प अधिकारी राजुरे, सरपंच सुनीता मठवाले, सदस्य संतोष पाटील, उपसरपंच मारोती तलारवार, विठ्ठाबाई बरसमवार, सुशिलाबाई सोमवार, कोंडाबाई वाघमारे, अशोक वाघमारे, विश्वनाथ बागेवार, पोस्ट कार्यालय, वन विभागाने अधिकारी, पोलीस विभागाचे अधिकारी आदींची उपस्थिती होती.
पुढे त्या म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी शैक्षणिक यशासह सामाजिक, सांस्कृतिक आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही सक्रिय सहभाग घेण्याचे प्रतिपादन केले. तसेच शिक्षक आणि पालकांनाही विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन देण्याचे आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनुकूल वातावरण तयार करण्याचे आवाहन केले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात महिलांना मार्गदर्शन केले. तसेच या योजनेचे अर्ज भरून घेण्यात आले.
बालीका पंचायत उपक्रमात येरगी ग्राम पंचायतीने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आज गावाला भेट दिली. या कार्यक्रमात बालिका पंचायत व ग्रामपंचायतीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्यासह मंचावरील उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शाळा परिसरामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी करनवाल यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच सुकन्या समृद्धी योजनेत गावातील बालीकांचे खाते काढण्यात आलेले पासबुकचे वितरण करण्यात आले.
येरगी ग्रामपंचायतीने बालिका पंचायत उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन गावात सकारात्मक बदल करण्यासाठी पुढाकार घेतला. तसेच अनेक दिवसांपासून दर रविवारी गावात राबविण्यात येणाऱ्या सामूहिक स्वच्छता मोहिमेबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी ग्रामपंचायत, बालिका पंचायत तसेच गावकऱ्यांचे कौतुक केले. ही मोहीम पुढे सुरू ठेवून गावाचा कायापालट करुन इतर गावांना मार्गदर्शक ठरावे, अशी अपेक्षा सीईओ मीनल करनवाल यांनी यावेळी व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील सहशिक्षक ईश्वर वाडीकर यांनी केले तर प्रभात फेरी व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालिका पंचायत राज समितीचे महादेवी दाणेवार, पुनम सुर्यवंशी, अंजली वाघमारे, करूणा बागेवार, शिवाणी मटपती, अनिता बागेवार, महादेव गादगे, रोहिणी दाणेवार, रूद्राणी चैडके, शिवकांता भुरळे, श्रीदेवी धाकपाडे, सर्व पदाधिकारी आणि शाळेतील सर्व शिक्षकांनी आनद कदम, राहुल ढगे, सिध्देश्वर कुटे, भुमन्ना तलगे, रमाकांत वाघमारे हणमंत थावरे परिश्रम केले. या कार्यक्रमाला सर्व बालिक पंचायत राज सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तंटामुक्त अध्यक्ष, पोलिस पाटील यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक, शालेय विद्यार्थी व महिला यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दौऱ्यादरम्यान खुशावाडी परिसरातील शेताच्या बांधावर जाऊन शेतकरी महिलांशी संवाद साधला. संवाद साधताना त्यांनी शेतकरी महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेबद्दल विचारणा केली. तेव्हा ही योजना माहिती असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु योजनेचा लाभ कसा घ्यावा, अर्ज करण्यासंदर्भात माहिती नव्हती. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची सविस्तर माहिती त्यांना दिली. त्यांनी या योजनेत मिळणारा लाभ, अर्ज करण्याची प्रक्रिया आणि योजनेचा उद्देश याबद्दल शेतकरी महिलांना समजावून सांगितले. तसेच मार्गदर्शन करुन योजनेचे फॉर्म वाटप केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या या दौऱ्यामुळे शेतकरी महिलांमध्ये योजनेबद्दल जागरूकता निर्माण झाली आणि त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित झाल्या. सीईओंची कार्यतत्परता आणि महिला शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्याची पद्धत हे या दौऱ्याचे विशेष आकर्षण ठरले. यावेळी उपस्थितांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या या कार्यपद्धतीचे कौतुक केले. या दौऱ्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची माहिती थेट बांधावरील शेतकरी महिलांपर्यंत पोहोचली.