मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र महिलाना प्रत्येक गावात ऑफलाइन व ऑनलाईन अर्ज भरून घेण्यासाठी कॅम्पचे आयोजन
नांदेड,११- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र महिला भगिनींना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावात ऑफलाइन व ऑनलाईन अर्ज भरून घेण्यासाठी कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी नांदेड तालुक्यातील कासारखेडा येथे बुधवार दिनांक १० जुलै रोजी आकस्मित भेट दिली. यावेळी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, अंगणवाडी कार्यकर्ती, संबंधित कर्मचारी यांनी शिबिर भरवून पात्र महिला भगिनींचे फॉर्म भरुन घेत असल्याचे आढळून आले. कासारखेडा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ऑफलाइन व ऑनलाईन फॉर्म भरण्यास मदत केली.
मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी यांची बैठक घेऊन प्रत्येक गावात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र लाभार्थ्यांचे ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज भरून घेण्यासाठी गावागावात कॅम्प लावण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सर्व गावात कॅम्पचे आयोजन करण्यात येत आहे. या कॅम्पमध्ये पात्र महिला भगिनींचे अर्ज भरून घेतले जात आहेत. यावेळी त्यांनी नांदेड तालुक्यातील कासारखेडा येथे आकस्मिक भेट दिली. यावेळी गट विकास अधिकारी नारवटकर यांची उपस्थिती होती.
माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, अपंग महिलांना राज्य सरकारकडून दरमहा १५०० रुपये अर्थसाहाय्य मिळणार आहे. ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. त्यामुळे गावातील सर्व पात्र महिला भगिनींचे ऑफलाइन व ऑनलाईन अर्ज गावागावात कॅम्प घेऊन भरून घ्यावेत, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी दिले आहेत. या संदर्भात दररोज सायंकाळी सहा वाजता जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी यांची आभासी पद्धतीने त्या आढावा घेत आहेत.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लभ घेण्यासाठी सुरुवातीला आधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र, आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तरीही चालणार आहे. त्याऐवजी महिलेकडे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला या चारी पैकी कोणतेहे ओळखपत्र/प्रमाणपत्र असल्यास ते ग्राह्य धरले जाणार आहे. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्मा दाखला किंवा शाळा सोडल्याचा आवश्यक आहे.
दरम्यान, सुरुवातीला कुटुंबाचे अडीच लाख रुपये उत्पन्न प्रमाणपत्र नसेल तर त्यांनी पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड सादर करावे. तसे अर्जासोबत उमेदवारांनी आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, बँक पासबुक व फोटो जोडणे आवश्यक आहे. तरी पात्र महिला भगिनींनी गावातील आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पमध्ये सहभागी होऊन आपले अर्ज दाखल करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी केले आहे.