अशोक चव्हाणांनी भाजपात येऊन स्वतःचं नुकसान केलं, राज्यसभेची लायकी नाही, माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील
नांदेड : लोकसभा निवडणूकीत भाजपला नांदेडसह मराठवाड्यात मोठं नुकसान झालं आहे. भाजपाला मराठवाड्यात एकही जागा जिंकता आली नाहीय. त्यातच नांदेडमध्ये अशोक चव्हाणांमुळे भाजप उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांचा पराभव झाल्याची चर्चा आहे. ”चव्हाणांमुळे भाजपाचा पराभव झाला नाहीये, उलट भाजपात येऊन अशोक चव्हाण यांनी स्वतःच नुकसान करून घेतलं आहे”. अशी परखड प्रतिक्रिया माजी केंद्रीय मंत्री तथा भाजप नेत्या सूर्यकांता पाटील यांनी दिली. राज्यसभा ही चव्हाणांसाठी लायकीची नसल्याचं देखील त्या म्हणाल्या. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
”लोकसभा निवडणुकीत भाजपने ४०० पारचा नारा दिला होता. मात्र या आकड्यापर्यंत भाजपाला पोहचता आलं नाही. कधी कधी राजकारणात निर्णय चुकतात, त्या निर्णयाचे परिणाम भोगावे लागतात. ४०० पारचा नारा दिला, २४० पर्यंत पोहोचलो. नुकसान पक्षाचं झालं, पण पंतप्रधान होणाऱ्या नरेंद्र मोदीचं झालं नाही”, असंही भाजप नेत्या सुर्यकांता पाटील म्हणाल्या. ”राजकारणात कधी कधी उंच उडी घेण्यासाठी दोन पाऊले मागे घ्यायला पाहिजे, लोकांच्या मनात काय आहे, हे कुठल्याही सर्वज्ञाला कळत नाही”, असं देखील त्या म्हणाल्या.
चव्हाणांमुळे भाजपला बळ, पण चव्हाणांचं नुकसान
”माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपात आल्याने भाजप उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांचा पराभव झाला”, अशी चर्चा आहे. ”पण कुठल्याही पराभवाचं दुषण एका नेत्यावर देऊन चालत नाही. अशोक चव्हाणांमुळे आमचा पराभव झाला असं कोणीही म्हणत नाही”, असं मत सूर्यकांता पाटील यांनी व्यक्त केले. ”अशोक चव्हाण हे भाजपात आल्याने भाजपाला समाधान वाटतं असेल, पण अशोक चव्हाण यांचं स्वतःच खूप नुकसान झालं आहे. अशोक चव्हाण हे खूप मोठे नेते आहेत, त्यांच्यासाठी राज्यसभा ही लायकीची नसल्याचं” मतं त्यांनी व्यक्त केलं.