राजकारण

लोकसभेत दोन नंबरचा पक्ष, विधानसभेसाठी ठाकरेसेना दक्ष; राऊतांनी आकड्यात सांगितलं मोठं लक्ष्य

मुंबई: एनडीएच्या मंत्रिमंडळातील नेत्यांनी दिल्लीत मंत्रिपदाची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ७२ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भवन येथे शिवसैनिकांची बैठक सुरु आहे. यापूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी महाविकास आघाडी किती जागा जिंकणार याचा आकडा सांगितला आहे. तसेच, महाविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणुका लढवू असंही त्यांनी स्पष्ट केलं.

विधानसभा निवडणूक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भवन इथे बैठक सुरू आहे. २८८ जागांवर संघटनात्मक बांधणी करण्याच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र विधानसभा निवडणूक लढवू याबाबत कोणी ही शंका घेऊ नये, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडी १८० ते १८५ जागा जिंकणार, विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा होणार असल्याची माहितीही संजय राऊत यांनी दिली. पावसाळा पाहता आम्ही इनडोअर बैठका घेणार असल्याचंही राऊत म्हणाले.

दरम्यान, संजय राऊत यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेल्या नरेंद्र मोदीं यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, कॅबिनेट त्यांनी ओढून ताणून बनवलेलं आहे. नितेश बाबू आणि चंद्राबाबू या दोन टेकूंचा त्यांनी आधार घेतला आहे. हे दोन टेकू असून या टेकूनचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत नाही हे समोर आलं, मोदींचा मुखवटा फाटला असून इकडून तिकडून बहुमत गोळा करून सरकार बनवण्यात आलं आहे. मोदींचा लोकशाहीवर विश्वास नाही, मोदींनी सातत्याने त्यांच्या कारकिर्दीत लोकशाहीचा गळा घोटला असल्याची टिकाही संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर केली.

दुसरीकडे त्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यावरुनही मोदी सरकारवर निशाणा साधला. संजय राऊत म्हणाले, निवडणूक काळात अमित शहा वारंवार सांगत होते आम्ही जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण मिळवलं, जम्मू-काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित केली, अतिरेक्यांचा विनमोड केला, पण काल झालेला हल्ला अत्यंत दुर्दैव आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button