जिला

बहुआयामी व्‍यक्तिमत्‍व: मिनल करनवाल – मिलिंद व्‍यवहारे जनसंपर्क अधिकारी जि.प. नांदेड

 

नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी मिनल कनवाल यांचा आज 4 जून रोजी वाढदिवस. त्‍यानिमित्‍ताने मिलिंद व्‍यवहारे यांचा हा लेख देत आहोत.

नांदेड जिल्‍हा परिषद ही समग्र ग्रामीण विकासाचा केंद्रबिुंदू आहे. मुख्‍य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी आखून दिलेल्‍या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्साहाने काम करतात आणि कामकाजाला गती मिळते. जिल्हाभर होणा-या दौऱ्यामुळे तळागाळातील प्रशासन सजग राहते. तसेच जनतेच्या समस्या कळतात. नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी असे विविध उपक्रम राबवून प्रशासनाला नवा आयाम दिला आहे.

मिनल करनवाल ह्या 2018 साली आयएएस झाल्‍या. त्‍यांनी देशात 35 वा रँक मिळविला. देहरादून उत्‍तराखंडमध्‍ये त्‍यांचा जन्‍म झाला. त्‍यांनी प्राथमिक शिक्षण सेंट जोसेफ अकादमीमधून पूर्ण केले. दिल्‍ली येथील सेंट स्‍टीफन्‍स कॉलेज मधून बी.ए. केले. त्‍यानंतर दिल्‍ली येथून आयएएस हाऊन त्‍या प्रशासनात आल्‍या.

नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या प्रशासनात मुख्‍य कार्यकारी अधिकारी म्‍हणून मिनल करनवाल ह्या 22 जूलै 2023 रोजी दाखल झाल्या. त्‍यानी आपल्‍या बहुआयामी व्यक्तिमत्वाने प्रशासनात स्वतंत्र ठसा उमटवला आहे. मुलांच्‍या गुणत्‍तेसाठी भविष्‍यवेध व ऑपरेशन गगन भरारी उपक्रम, बालीका पंचायत, ई-फाईल ट्रेंकिंग, क्‍यूआर कोड, नरेगा हेल्‍पलाईन, सिक्स बंडल सिस्टिम, पंचायत समितींना आयएसओ मानांकन, कुपोषणमुक्‍तीसाठी सुपोषण अभियान, मॉडेल गाव, आदिवासी भागातील गरोदर मातांना अमृत आहार योजना, खाते प्रमुख यांच्‍या क्षेत्रभेटी, माळेगाव यात्रेचे सुजज्‍य नियोजन, गावे समृध्‍द होण्‍यासाठी गाव दत्‍तक मोहिम, मतदानाचा टक्‍का वाढविण्‍यासाठी जनजागृती, लोकसहभागातून वृक्ष लागवडीचा उपक्रम तसेच दुर्गम भागाला भेटी आदी उपक्रमामुळे अल्‍पवधीतच मुख्‍य कार्यकारी अधिकारी मिनल कनवाल यांनी नांदेड जिल्ह्यात आपला ठसा उमटविला आहे.

जिल्ह्याचा विस्तार व क्षेत्र पाहता जिल्ह्याचा भौतिक सुविधासह इतर बाबींचा विचार करून लोकसहभाग व शासकीय दृष्ट्या विकासात्मक कामे लवकर करणे हे उद्दिष्ट समोर ठेवून नांदेड जिल्ह्यात जिल्हास्तरावरून विद्यार्थी केंद्रबिंदू ठरवून ऑपरेशन गगन भरारी ही एक लोकहित व विद्यार्थी हित जोपासण्याची नवीन संकल्पना मुख्‍य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी आंमलात आणली. यामध्ये जिल्हा परिषद शाळांची गुणवत्तावाढ, पायाभूत व भौतिक सुविधा, विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, पोषण आहार इत्यादी बाबी या नावीन्यपूर्ण उपक्रमातून उपलब्ध करून देणे हा उद्देश आहे. हा उपक्रम राबवताना शाळांना शिक्षक उपलब्ध करून देणे, शाळांना अनुदान वाटप, पाणीपुरवठा व शाळा सफाई व ग्रंथालय, शालेय पोषण आहार, CSR फंड, लोकसहभाग उपलब्ध करून शाळेत आमुलाग्र बदल करण्यासाठी सतत हा उपक्रम राबविण्‍यात येणार आहे. यामध्ये शाळा रंगरंगोटी, पिण्‍याच्‍या पाण्‍याचे व्यवस्थापन, मुलींचे स्वच्छता गृह, ग्रंथालयात पुस्तके व CSR फंड या बाबी उपलब्ध झाल्या आहेत.

ग्राम पातळीवरील कर्मचारी गावात वेळेत उपस्थित राहून आपले कर्तव्य बजवावे यासाठी गावस्तरावर कर्मचारी उपस्थितीसाठी सीईओ मिनल करनवाल यांनी क्‍यूआर कोड प्रत्‍येक गावात लावण्‍याची संकल्‍पना साकारली. यातुन जिल्‍हयात सुमारे 7 हजार 853 क्यूआर कोड लावण्यात आले आहेत. यामध्ये शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी, गाव स्तरावर सर्व कर्मचारी यांचा समावेश आहे. या उपक्रमामुळे बहुतांश कर्मचारी गावस्तरावर उपस्थित राहून कार्य बजावत आहेत.

त्‍याचबरोबर महिला सक्षमीकरण व मुलींच्या विकासाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात बालिका पंचायत हा अभिनव उपक्रम मुख्‍य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी हाती घेतला. 1 फेब्रुवारी 2024 रोजी जिल्हास्तरावर कार्यशाळा घेवून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. जिल्‍हयाती दोनशेहून अधिक गावात हा उपक्रम सुरु आहे. भविष्यात मुलींच्या सामाजिक आणि राजकीय विकासाला प्रोत्साहन देणे. तसेच त्यांचा राजकारणात सक्रिय सहभाग सुनिश्चित करणे. बालविवाह आणि हुंडा यासारख्या प्रथा तसेच स्त्री-पुरुष असमानता समाजातून काढून टाकणे हे बालीका पंचायत उपक्रमाचे उद्देश आहेत.

मुख्‍य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी अनेक ठिकाणी उघडयावर भरणा-या अंगणवाडयाकडे लक्ष दिले. नांदेड जिल्ह्यात एकूण 3 हजार 722 अंगणवाडी केंद्र मंजूर असून, त्या कार्यान्वित आहेत. यापैकी 2 हजार 379 अंगणवाड्यांना स्वतःच्या इमारती आहेत. परंतु 1 हजार 343 अंगणवाड्यांना स्वतःच्या इमारती नाहीत. त्यामुळे या अंगणवाडी गावातील समाज मंदिर, ग्रामपंचायत तसेच भाड्यांच्या इमारतीमध्ये भरतात. ही बाब निदर्शनात आल्यानंतर मिनल करनवाल यांनी गावस्तरावर सर्वे करून 528 अंगणवाड्या शाळेमध्ये स्थलांतरित केल्‍या आहेत.

जिल्हा परिषदेतील आस्थापनेवरील वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचाऱ्यांना वैयक्तिक लाभ मिळण्यासाठी विशेष मोहीम मुख्‍य कार्यकारी अधिकारी करनवाल यांनी हाती घेतली आहे. कर्मचारी म्हणून नोकरीत रुजू झाल्यानंतर आस्थापनाविषयक बाबी महत्त्वाच्या असतात. प्राथमिक नियुक्ती पासून पदोन्नती, सेवा पुस्तिका व वार्षिक पडताळणी, वार्षिक वेतनवाढ, स्थायित्वाचा लाभ, भविष्य निर्वाह निधी/DCPS कपात, वेतन आयोग अशा विविध 24 बाबींची माहिती गुगल शिटव्‍दारे अपडेट करून कर्मचाऱ्यांना लाभ दिला जात आहे. या अभिनव संकल्‍पनेमुळे सर्व कर्मचारी खुश आहेत. तसेच कार्यालयातील विविध विभागातील प्रलंबित संचिका निकाली काढण्‍यासाठी नांदेड जिल्‍हा परिषदेत ई- फाईल ट्रॅगिंक सिस्टिमची सुरवात सीईओ मिनल करनवाल यांनी सुरु केली. प्रायोगिक तत्वावर या प्रणालीव्‍दारे शिक्षण व आरोग्‍य विभाग ऑनलाईन करण्‍यता आला आहे. दिनांक 9 जानेवारी 2024 पासून या प्रणालीव्‍दारे प्रायोगिक तत्वावर आरेाग्‍य विभाग तसेच शिक्षण विभाग प्राथमिक व माध्‍यमिक विभागात हे काम सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे 1 हजार 623 पेक्षा अधिक फाईल्सचा निपटारा करण्यात आला आहे. सर्व विभागात हा उपक्रम राबविण्यात येणार असल्‍याचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांनी सांगीतले.

जिल्‍हा परिषद अंतर्गत विविध समस्‍या घेऊन अभ्यागत हे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात दाद मागण्यासाठी निवेदन देत असतात. परंतु दिलेल्या अर्जाचे वेळेत निपटारा होत नसल्याचे निदर्शनात आले. त्यासाठी 1 ऑगस्ट 2023 पासून अभ्यागतांचे प्रश्न सोडविण्यासाठी टाईम बाउंड कार्यक्रम (कालबद्ध कार्यक्रम) राबविण्यास सुरुवात केली आहे. या उपक्रमामुळे अभ्यागतांचे प्रश्न तात्काळ निकाली निघत आहेत.

नागरिकांच्या व कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रत्येक कार्यालयात ठराविक वेळेत अभ्यागतांच्या भेटी घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून तसेच त्यांची निवेदने घेऊन संबंधित विभागाकडे पाठवले जाते. परंतु त्यावर पुढे काय कार्यवाही होते, त्यांचे प्रश्न निकाली निघतात का? याकडे मात्र कोणाचेही लक्ष नसते. पुन्हा-पुन्हा ते नागरिक कार्यालयात चकरा मारत असतात. ही बाब निदर्शनात आल्यानंतर मुख्‍य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी हे प्रश्न निकाली काढण्यासाठी टाईम बाउंड कार्यक्रम हाती घेतला. या उपक्रमांतर्गत अभ्यागतांचे अर्ज संबंधित विभागात गेल्याची नोंद व त्यावर 15 दिवसाच्या आत निकाली निघालेली प्रकरणे याची माहिती सीईओ यांच्या कक्षात ठेवली जात आहेत. टाईम बाउंड उपक्रमात अनेक प्रकरणे निकाली निघत आहेत.

केंद्र शासनाच्या अत्यंत महत्वाकांक्षी असलेल्‍या जल जीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत जिल्‍हयात 1 हजार 234 गावांमध्‍ये पाणी पुरवठयाची कामे होत आहेत. त्‍यापैकी 352 योजना भौतिकदृष्‍टया पूर्ण असून 426 योजनांव्‍दारे पाणी पुरवठा सुरळीत सुरु आहे. अशा एकूण 778 योजनांव्‍दारे प्रत्‍यक्षात पाणीपुरवठा केला जात आहे. त्‍यामुळे या गावांची पाणीटंचाई दूर झाली आहे. याशिवाय गावे स्‍वच्‍छ व सुंदर होण्‍यासाठी मुख्‍य कार्यकारी अधिकानी मिनल करनवाल यांनी स्‍वत: जिल्‍हयातील 17 गावे दत्‍तक घेतली आहेत. त्‍याच बरोबर खाते प्रमुख व गट विकास अधिकारी यांना देखील पाच-पाच गावे दत्‍तक दिली आहेत. यामुळे गावांचाही कायापालट होणार आहे. तसेच कुपोषमुक्‍तीसाठी आयआयटी मुंबई यांच्‍याशी सामजस्‍य करार करून सुपोषणसाठी विशेष मोहिम हाती घेतली आहे. अमृत आहार योजनेत अदिवासी भागातील किनवट व माहूर तालुक्‍यातील गरोदर मातांना सकस आहारात अंडी, मोड आलेली मटकी, पनीर आदी आहार सीईओंच्‍या पुढाकारातून दिला जात आहे.

मुख्‍य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांची झोकून देऊन काम करण्याची खास वृत्ती. त्या सतत जिल्हाभरात फिरून कामाचा आढावा घेतात. अवघ्‍या आठ महिन्‍यात त्‍यांनी जिल्‍ह्यातील सोळाही तालुक्‍यातील गावांना भेटी दिल्‍या आहेत. त्‍या लोकांशी बोलतात. लाभार्थ्यांची चर्चा करतात. अधिकारी व कर्मचाऱ्यांची बोलून त्यांच्या अडचणी समजून घेतात आणि मार्गदर्शन करतात. अशा बहूआयामी व्‍यक्‍तीमत्‍व असलेल्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी मिनल कनवाल यांना वाढदिवसाच्‍या हार्दीक शुभेच्‍छा.

– मिलिंद व्‍यवहारे, नांदेड

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button