नरेगातंर्गत किनवट तालुक्यात १ हजार ४०० वैयक्तिक विहिरींना प्रशासकीय मान्यता २६ हजार मजुरांना मिळणार रोजगार
नांदेड,३० एप्रिल- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत किनवट तालुक्यातील १ हजार ४०० लाभार्थ्यांना सिंचन विहिरीचा लाभ देण्यात येणार असून, यास प्रशासकीय मान्यता देखील देण्यात आली आहे, अशी माहिती किनवट पंचायत समितीचे गट विकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव यांनी दिली आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरींसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी, अल्पभूधारक आदींना वैयक्तिक सिंचन विहिरीचा लाभ देण्यात येतो. या आर्थिक वर्षात किनवट पंचायत समिती अंतर्गत १ हजार ४०० लाभार्थ्यांना या सिंचन विहिरीचा लाभ देण्यात आला आहे.
२६ हजार मजुरांना मिळणार रोजगार
नरेगा अंतर्गत मागेल त्याला काम देण्यात येते. किनवट तालुक्यातील १ हजार ४०० विहिरींना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. एका विहीरीच्या कामासाठी दरदिवशी १९ मजूर लागतात, त्यानुसार तालुक्यात सुमारे २६ हजार ६०० मजुरांना त्यांच्याच क्षेत्रात ४५ दिवस रोजगार उपलब्ध होणार आहे. परंतु यासाठी कामगारांनी ग्रामपंचायतीकडे कामाची मागणी करणे आवश्यक आहे. किनवट तालुक्यातील १ हजार ४०० सिंचन विहिरींसाठी मजुरांना काम उपलब्ध करून द्यावे. तसेच पावसाळ्यापूर्वी या विहिरींची कामे पूर्ण करावीत, असे निर्देश गटविकास अधिकारी यांना मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी दिले आहेत.