गरोदर व स्तनदा मातांना प्रोटीनयुक्त आहार आहारामध्ये अंडी, पनीर, सोयाबीनचा समावेश किनवट तालुक्यात अभिनव उपक्रम
नांदेड, 30- गरोदरपणात आईच्या आहारावर तिचे व तिच्या बाळाचे आरोग्य अवलंबून असते त्यामुळे गर्भवती स्त्रीने सकस, पुरेसा व पोषक आहार घेणे आवश्यक आहे. यासाठी आहार व्यवस्था ही माता आणि बाळ या दोघांना विचारात घेऊन केली जावी यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या मार्गदर्शनात विशेष मोहीम राबवली जात असून याची किनवट तालुक्यात प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे.
मानव विकास अंतर्गत किनवट तालुक्या दर महिन्यातून दोन वेळा गरोदर माता व स्तनदा मातांना आरोग्य विषयक मार्गदर्शन या महिलांसह शून्य ते सहा वर्ष वयोगटातील बालकांना प्रोटीनयुक्त आहार दिला जात आहे. गरोदर मातेला दैनंदिन जवळपास 50 ते 70 ग्रॅम प्रोटीनची आवश्यकता असते. परंतु आपल्या आहारात प्रोटीनचे प्रमाण नगण्य असते. आहारात कार्बोराईडचे (भात, पोळी, पोहे, मैद्याचे पदार्थ) प्रमाण अधिक असल्यामुळे मधुमेह, अति लठ्ठपणा, रक्तदाब आदी आजार जडण्याची शक्यता असते.
मानव विकास अंतर्गत यापूर्वी महिलांना भाजी, पोळी, वरण-भात असा आहार दिला जायचा. परंतु यामध्ये प्रोटीनचे प्रमाण कमी असल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलन करनवाल यांनी प्रोटीनयुक्त आहार देण्यासंदर्भात आवाहन केले होते. त्यानुसार किनवट तालुक्यामध्ये महिलांना आहारामध्ये अंडी, पनीर, सोयाबीन, चिकन आदी पदार्थ दिले जात आहेत. या उपक्रमाला किनवट तालुक्यातील इस्लापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातून सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी किनवटचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.के. पी. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात अंमलबजावणी केली जात आहे. सोबतच स्तनदा मातेने पहिल्या सहा महिन्यापर्यंत स्तनपान योग्यरित्या करणे गरजेचे असून त्याची जनजागृती आशा वर्कर, अंगणवाडी कार्यकर्ती, आरोग्य कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत केली जात आहे.
नांदेड जिल्ह्यातील कुपोषणमुक्तीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी आयआयटी मुंबई यांच्यासोबत यापूर्वीच सामंजस्य करार देखील केला आहे. त्यानुसार जिल्ह्यात काम देखील सुरू आहे.
नांदेड जिल्ह्यामध्ये स्त्री-पुरुष यांची उंची ईतर राज्यांच्या तुलनेत खूपच कमी आहे. त्याचे कारण आहारातील प्रोटीनचे प्रमाण कमी असणे हे आहे. जन्मलेल्या बाळाच्या शारीरिक व बौद्धिक वाढीसाठी गरोदर माता व बालकास प्रोटीनयुक्त आहार देण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी केले आहे.