जिला

नवमतदार युवतींचा महिला दिनाला लोकशाही जागर प्रमुख रस्त्यांवर रॅलीचे आयोजन, मताधिकार बजावण्याचे आवाहन

नांदेड, दि 8 : आपल्या एका मताने काय फरक पडते. पाठिंबा, विरोध, तटस्थताही माहिती पडते. मात्र त्यासाठी नव मतदारांनी लोकशाही व्यवस्था अधिक बळकट व समृद्ध करण्यासाठी लोकशाहीचा श्वास असणाऱ्या मतदान प्रक्रियेत सहभागी होणे आवश्यक आहे. त्यामुळे 18 वर्षावरील प्रत्येकाने आपला मताधिकार बजावावा, असे आवाहन करत नांदेड शहराची पहाट आज नवमतदार युवतींनी दुमदुमून सोडली. महिला दिनाला शेकडो नवयुवतीची रॅली लक्षवेधी ठरली.

नव मतदार युवती व महिलांनी मतदान प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी होऊन मोठ्या प्रमाणात मतदान करावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी या विशेष रॅलीचे व बालिका पंचायत विशेष उपक्रमाचे आयोजन केले होते. या कल्पक आयोजनाला पाठबळ देत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, नांदेड-वाघाळा महानगरपालिकेचे आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांनी शहरात रॅलीमध्ये सहभागी होत नव मतदार युवतींचा उत्साह वाढविला. सकाळी दीड तास युवतींच्या उत्साहात प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही रॅली शहराच्या प्रमुख रस्त्यावर लोकशाहीचा जागर करीत होती. मतदान का कशासाठी या संदर्भातील अनेक घोषवाक्य, हातातील फलक यावेळी लक्ष वेधून घेत होते.
जागतिक महिला दिनाच्या औचित्याने नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने नव मतदार युवती व महिलांसाठी मी मतदान का व कशासाठी करणार या विषयावर नांदेड शहरातून आज शुक्रवार दिनांक 8 मार्च रोजी भव्य रॅलीचे आयोजन करण्‍यात आले होते.

सकाळी साडेसात वाजता नांदेड शहरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून रॅलीला सुरुवात करण्यात आली. प्रथम महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, नांदेड-वाघाळा महानगरपालिकेचे आयुक्त महेश कुमार डोईफोडे, यांच्या हस्ते आकाशात तिरंगी फुगे सोडून व रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरुवात झाली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम -कदम, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी माधव सलगर, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, सान्वी जेठवाणी, उप शिक्षणाधिकारी बंडू आमदुरकर आदींची उपस्थिती होती.

वय 18 वर्षे पूर्ण झालेल्या मुली आता पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावतील. सर्व तरुण मुलींनी स्वतःला प्रश्न विचारावा. मी मतदान का? आणि कशासाठी? करणार. आपणच विवेकाने विचार करावा या हेतूने या रॅलीचे अयोजन करण्‍यात आले होते. या रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळाला. पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणा-या तरुणींनी Why will i vote ? तसेच विवेकाने विचार करायला लावणारे विविध फलक अनेकींच्या हातात होते. मी मतदान का व कशासाठी करणार याविषयीचे मनोगतही नव मतदार युवतीने यावेळी व्यक्त केले. अनेक नव मतदार युवती भारतीय परंपरेतील वेशात रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या. रॅलीचा समारोप शहरातील आयटीआय परिसरातील महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याजवळ करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नांदेड फ्लॉगर्स व भोकर येथील संकल्प प्रतिष्ठानच्या युवक-युवतींनी मतदान जनजागृती संदर्भात पथनाट्य सादर केले.

समारोपाला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी संबोधित केले. नांदेड जिल्हा परिषदेने विविध नव-नवे अभिनव उपक्रम सुरू केले आहेत. त्यामधील बालिका पंचायत हा अभिनव उपक्रम आहे. ज्यामध्ये गावाच्या निर्णय प्रक्रियेत मुलींचा सहभाग, त्यांच्या मतांचा विचार घेतला जात आहे. यामधूनच मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल, असे मत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत त्यांनी व्यक्त केले.
भारताचा विकास लोकशाही व्यवस्थेतून होणार आहे. त्यासाठी 100% मतदान हाच एकमेव मार्ग आहे. तो आपला मताधिकार आहेच. मात्र राष्ट्रीय कर्तव्य देखील आहे. यातून जनाधार कळत असतो. जनाधार व्यक्त करण्याच्या या प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-कदम यांनी केले. तसेच उपस्थितांना त्यांनी जागतिक महिला दिनानिमित्त शपथ दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रलोभ कुलकर्णी व मिलिंद व्यवहारे यांनी तर आभार डॉ. विलास ढवळे यांनी मानले. या रॅलीत नांदेड शहरातील विविध महाविद्यालयातील युवती, महिला, अधिकारी व कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

 


नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने गावा-गावातून शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय उन्नतीसाठी बालिका पंचायत विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत देगलूर तालुक्यातील येरगी, हदगाव तालुक्यातील सावरगाव माळ व अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथील बालिका पंचायतच्या युवतींचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व बुके देऊन गौरव करण्यात आला.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button