दस्त नोंदणी कार्यालय घेणार मोकळा श्वास
नांदेड दि.2 नांदेड येथील व्हीआयपी रोडवर असलेले रजिस्ट्री ऑफिस म्हणजेच दस्त नोंदणी कार्यालय हे अनेक वर्षापासून अपुऱ्या जागेमध्ये आपले कामकाज चालवत आहे. दस्त नोंदणी कार्यालयाच्या अपुऱ्या जागेमुळे येथील कर्मचारी अधिकारी व सामान्य नागरिकांनाही त्रास होत होता. सर्वच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या टेबलावर फाईलचा ढिग असल्याचे चित्र नेहमीचेच आहे. दस्त नोंदणीसाठी येणाऱ्या लोकांना सुद्धा या कार्यालयात आल्या नंतर एखाद्या कोंडवाड्यात आल्यासारखी अनुभूती येते.
पण आता या सर्वांपासून सुटका होणार आहे कौठा येथे नियोजित होत असलेल्या तहसील कार्यालयामध्ये दस्त नोंदणी कार्यालयाला सुद्धा इमारत उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे दस्त नोंदणी कार्यालय हे मोकळा श्वास घेईल असेच म्हणावे लागेल. अपुरी जागा व होणारी गर्दी याचा परिणाम कामकाजावर देखील वारंवार होत होता कार्यालयात फाईलचे गठ्ठे ठेवण्यासाठी सुद्धा अपुरी जागा असल्यामुळे ज्या ठिकाणी जागा दिसेल त्या ठिकाणी फाईलचे गठ्ठे ठेवल्याचेही या कार्यालयात आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे दस्त नोंदणी कार्यालयाला नवीन इमारतीची आवश्यकता होती ती निश्चितच आता मिळणार आहे