जिला
पाणी पुरवठा विभागांची वीज देयके ग्रामपंचायतीने अदा करावीत – मीनल करनवाल
नांदेड,25- राज्यातील ग्रामपंचायतींना त्यांची पाणीपुरवठा योजनेची वीज देयके (पाणी पंप) 15 व्या वित्त आयोगातून अदा करण्यासंदर्भात राज्य शासनाने पत्र निर्गमित केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीनी पाणी पुरवठा योजनेची देयके बंधित निधीतून अदा करण्याचे निर्देश नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले आहे.
अनेक ठिकाणी पाणी पुरवठा योजनेची देयके अदा झालेली नाहीत. सध्या परिस्थिती पाहता पंधरावा वित्त आयोगाच्या बंधित अनुदानातून पाणी पुरवठा योजनांची देयके अदा करण्यासंदर्भात ग्रामविकास विभागाने 8 जानेवारी 2024 रोजी पत्र निर्गमित केले आहे. यासंदर्भाने सर्व ग्रामपंचायतींना पत्र पाठवण्यात आले आहे. पंधरावा वित्त आयोगाच्या निधीतून हे देयक अदा करावयाचे आहेत. तसेच पाणी पुरवठा योजनेची विद्युत देयके अदा करून पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या बंधित निधीतून इतर खर्च नंतर करावा. ग्रामपंचायतीने लवकरात लवकर सौर उर्जेवर भर देऊन त्याचा वापर करण्यास प्राधान्य द्यावे, जेणेकरून भविष्यामध्ये विद्युत देयकाची रक्कम कमी होईल.
व्यवस्थित लेखांकन होण्याच्या दृष्टीने आणि घटनात्मक दुरुस्तीच्या अनुषंगाने त्या त्या ग्रामपंचायतीने 15 व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या बंदीत अनुदानातून पाणी पुरवठा विभागांची वीज देयके ग्रामपंचायतीने अदा करावीत असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल व उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे यांनी केले आहे.